मंदिर लुटीचा विषय धसास लागत नाही, तोपर्यंत आम्ही सोडणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले; अयोध्या आणि काशी विश्वनाथ यांच्या दर्शनाला जाऊन महाआरती करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंदिर लुटीचा विषय जोपर्यंत धसास लागत नाही, तोपर्यंत आम्ही सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. तसेच मुंबईत, नागपूरमध्ये महाआरती केली. मी तर राज्यात सगळीकडे जणार आणि बाहेरच्या राज्यात अगदी अयोध्येला आणि काशी विश्वनाथ यांच्या सुद्धा दर्शनाला जाऊन महाआरती करेन, अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली. आयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी विरोधात शिवसेनेने आज नागपुरात ‘रामरक्षा’ आंदोलन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात भाजपवर घणाघात केला.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो… आज पुन्हा एकदा राम मंदिराच्या लढ्याला सुरुवात करतो आहोत. आपण सर्वजण साक्ष आहात, काही वर्षापूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी मंदिर निर्माणाच्या लढ्याला एक तेज प्राप्त करून दिलं होतं. आज मला नाही म्हटलं तरी वाईट वाटतंय की मंदिर उभं जरूर राहिलं पण नवा लढा मंदिराच्या रक्षणा करता आपल्याला सुरू करावा लागतोय. या मंदिराच्या सर्व गुरुजींना धन्यवाद देतो, त्यांनी मनापासून सहकार्य केलं. नुसतं सहकार्यच नाही तर आशीर्वाद सुद्धा दिलेत. या कार्यक्रमासाठी ज्या ज्या शिवसैनिकांनी मेहनत केली त्यांना सुद्धा धन्यवाद देतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आज सकाळी संजय राऊतांचा फोन आला, मला म्हणाले टेलिप्रॉम्प्टर ठेवायचा का? म्हटलं का? नाही कारण, मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलंय उद्धव ठाकरेंनी रामरक्षा बोलून दाखवावी. मी आज त्यांना त्यांच्याच गावात येऊन सांगतोय की, फडणवीसजी रामरक्षा म्हणणं जरी तुमचं काम असलं तरी रामरक्षा करणं हे आमच्या रामभक्तांचं काम आहे. आम्ही राम रक्षक आहोत. मनामध्ये भाव नाही आणि रामरक्षा म्हणताहेत. मनी नाही भाव आणि देवा मला पाव, हे आमचं हिंदुत्व नाहीये, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

आज सकाळी नागपूरसाठी निघाल्यानंतर पहिली बातमी दिल्लीतून आली. गेली २० दिवस देशातल्या तरुणांच्या भविष्यासाठी सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले होते त्यांची कशा पद्धतीने उचलबांगडी केली? जणू काय एखाद्या अतिरेक्याला पकडावं तसं पोलीस घुसले. चादरी टाकल्या आणि उचलून घेऊन गेले. दीपके यालाही मारहाण केली. त्याच्या अंगावर शाई फेकली. आणि ज्या पद्धतीने हे सरकार वागतंय, मी प्रभू रामचंद्राला हे विचारलं की, श्रीरामा हे काय झालंय? ज्या भाजपने तुझ्या नावाने मतं मागून सत्ता मिळवली त्या भाजपच्या अंगात श्रीरामाच्या ऐवजी सैतानाचा आत्मा घुसलाय की काय? माणुसकी गेली बाजूला यांच्यातला सैतान कसा काय जागा झाला? एवढे कसे हे सत्ता पिपासू झाले. आणि मोहनजी भागवत यांना विचारायचं आहे, कारण हे नागपूर आहे की, भागवतसाहेब ज्या पद्धतीने हे भाजप सरकार वागतंय, मंदिरं लुटली जाताहेत. विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने वागताहेत हे तुम्ही बघितलंय. पेपरफुटताहेत, पक्ष तर फोडले जाताहेत पण आता मंदिरातल्या तिजोऱ्या फोडल्या जाताहेत, हेच हिंदू राष्ट्र तुम्हाला अपेक्षित होतं काय? आमचं हिंदुराष्ट्र हे नव्हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये रामराज्य अपेक्षित आहे, शिवशाही अपेक्षित आहे. गोरगरीबांना महिलांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना न्याय देणारं हे खरं आमचं हिंदू राष्ट्र आहे. कॉन्ट्रॅक्टरना अभय देणारं हिंदूराष्ट्र आमचं असून शकत नाही. म्हणून भागतसाहेब तुम्ही फेब्रुवारीत बोलला होतात की, या देशातले मुस्लिम सुद्धा हिंदूच आहेत. आणि हिंदुंनी दोन ते तीन आपत्य जन्माला घालायला पाहिजेत. ही आपत्य जन्माला घातलीत आणि परीक्षेतले पेपर फुटलेत, अनेकांनी आत्महत्या केल्यात त्यांचं पहिले काय करणार? आणखीन आपत्य जन्माला घालून पुन्हा तुम्ही त्यांना तसेच चिरडणार आहात? हे हिंदू राष्ट्र आमच्या संकल्पनेतलं नाही. अजिबात नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फटकारले.

ज्या वेळेला बाबरीचा लढा झाला, बाबरीचं पतन झालं, बाबरी पाडली गेली. हे आज सत्तेवर बसलेत त्यापैकी एकही कोणी छाती पुढे काढून आला नव्हता. तेव्हा फक्त एकमेव हिंदुहृदयस्रमाट उभे राहिले होते. कारण भाजपवालेच तेव्हा म्हणत होते, हे आमचं काम नाही असेल तर शिवसैनिकांचं काम असेल. मी स्वतः तेव्हा बाळासाहेबांच्या बाजूला उभा होतो. तेव्हा संजय राऊत यांनी बाळासाहेबांना फोन केला होता. आणि बाळासाहेबांनी उत्तर दिलं होतं जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. गर्व से कहो हम हिंदू है, ही घोषणा त्यांनी बुलंद केली होती. अनेक कारसेवकांनी तुरुंगवास भोगला. अनेकांनी बलिदान केलं. अनेकजण त्यावेळेला झालेल्या पोलीस अत्याचारामध्ये कायमचे अपंग झाले. बाळासाहेबांनी जो धोका डोक्यावर घेतला होता, अनेकजणांनी जे बलिदान केलं हे यांच्या चोरांच्या पोटापाण्यासाठी नव्हतं केलं. मंदिर वही बनायेंगे, कशाला बनाने के बाद लुटने के लिये? आम्ही आहोत ते मंदिर लुटारुंच्या विरुद्ध आहोत. फडणवीसांनी आमची चेष्टा, टिंगल, मस्करी करण्यापेक्षा तुम्ही मंदिर लुटणाऱ्यांच्या बाजूने आहात की रामरक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहा ते पहिले स्पष्ट करा. हे आंदोलन म्हणजे रामरक्षा पाठ आहे की नाही हे बघण्याचं आंदोल नाही. हे एखाद्या वर्गाच्या मॉनिटरसारखं बोलू नका, रामरक्षा पाठ आहे की नाही? रामरक्षा म्हणजे आज जे आपण जे आपण नेहमी म्हणतो की रामाने आपली रक्षा केली पाहिजे आज रामभक्तांना रामाची रक्षा करण्याची वेळ रामाच्या नावाने मतं मागून सत्तेत आलेल्या भाजपच्या कारभारामध्ये आपल्याला करावी लागतेय. याच्या सारखं हिंदूंचं दुर्दैवं कोणतं? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

कोणतं असं क्षेत्र आहे की, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार नाहीये? केदारनाथ, बद्रिनाथच्या मंदिरात चोरी झालेली आहे. उज्जैनमध्ये जमीन घोटाळा झाला आहे. अयोध्येमध्ये जमीन घोटाळा झालेला आहे. अयोध्येत सुद्धा मंदिराच्या नावाने स्वस्तात जमिनी घेतल्या आणि शतपटीने किमती वाढवून ट्रस्टला विकल्या गेलेल्या आहेत, हे मी नाही सगळे म्हणताहेत. अनेकजण साधू आहेत राग, संताप व्यक्त करत आहेत. एका साधूने सांगितलं तर हे मंदिर नाहीये हे तर म्हणे भाजपचं पैसा गोळा करण्याचं केंद्र झालेलं आहे. एटीम. आणि आणखी काहीजण म्हणाले की, तिथे तिजोरीवरती जो काही डल्ला मारला गेला त्यातून आमदार, खासदार विकत घेतले गेले. आज त्या गद्दारांना सुद्धा विचारायचं आहे. माझ्यावरती आरोप करत होतात बाळासाहेबांचे विचार सोडले? अरे मी बाळासाहेबांचे विचार घेऊन आज सुद्धा ठामपणे उभा आहे. मंदिर चोरांना आम्ही जाब विचारायला उभे आहोत, तुमच्यामध्ये जर हिंमत राहिली असेल तर तुम्ही भाजपला प्रश्न विचारून दाखवा? त्यांच्या घरचे पाणके होऊ नका. गद्दारांच्या अंगात हिंदुत्वाचं रक्त असेल तर त्यांनी मंदिर चोरांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. का नाही करत? कारण यांच्यात दम राहिलेला नाही, लाचार होणारा हा कधी हिंदू नाहीये. मी घातलेला भगा झब्बा आणि हातात भगवा झेंडा हा काही गंमत म्हणून घेतलेला नाही. आमच्या अंगामध्ये जे हिंदुत्व शिवसेनाप्रमुखांनी भिनवलं आहे त्याचं हे प्रतिक म्हणून आम्ही भगव्या टोप्या, भगवा झब्बा आणि भगवे झेंडा घेऊन फिरतो आहोत. ही काही नाटक कंपनी काढलेली नाही, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.

गेल्या वेळेला याच भाजपने आपल्याबरोबर दगाबाजी केली. आणि म्हणून आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करावं लागलं. तेव्हा हेच काहूर करत होते, हिंदुत्व सोडलं… हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही हिंदुत्व सोडूच शकत नाही पण आज मला भाजपला विचारायचं आहे तुम्ही का हिंदुत्व सोडलत? तुम्ही का बोलत नाहीत? आणि माझी तर ठाम मागणी आहे. यांनी स्थापन केलेली एसआयटी हे थोतांड आहे, ही नाटकं आहेत. एक एक विषय निर्माण झाले की, दुसरा विषय काढायचा की पहिला विषय लोक विसरून जातात. आणि मग त्याचच भांडवलं करायचं. त्यांना माहिती आहे लोकांची मेमरी ही जास्त दिर्घकालीन नसते. पण मंदिर लुटीचा विषय जोपर्यंत धसास लागत नाही, तोपर्यंत आम्ही सोडणार नाही. मुंबईमध्ये केली, नागपूरमध्ये महाआरती केली. मी तर राज्यात सगळीकडे जणार आणि बाहेरच्या राज्यात अगदी अयोध्येला आणि काशी विश्वनाथ यांच्या सुद्धा दर्शनाला जाऊन मी महाआरती करेन, अशी घोषणा करत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा जाहीर केला.

हिंदुत्वाला जाग माझ्या वडिलांनी आणलेली आहे. होय घराणेशाही म्हणा पाहिजे तर, माझ्या वडिलांनी आणलेली आहे. त्यांनी जागा केलेला हिंदू मी झोपू देणार नाही. ही चौकशीची थेरं, चौकशीची नाटकं करू नका. जर तुम्हाला प्रामाणिकपणाने याचा निकाल लावायचा असेल तर निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करा. आणि हे न्यायमूर्ती सुद्धा गोगलगायी सारखे नकोत, आरत्या ओवाळणारे नकोत. निस्पृह आणि निःपक्षपातीपणाने काम करणारे अभय ओक यांच्यासारखे निवृत्त न्यायमूर्ती तिकडे नेमा. आणि दूध का दूध पाणी का पाणी, बघा कशात काय ते शोधा तुम्ही, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.

आम्ही कशावरही प्रश्न विचारायचे नाहीत. काही विचारलं तर हे देशद्रोही ठरवतात. आणि या राम मंदिर चोरीबद्दल यांच्यातले एक महान व्यक्ती आहेत… उत्तर प्रदेशचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत सतीश महाना. ते म्हणातेहत की, ज्यांनी श्रद्धेने पैसे दिलेले नाहीत त्यांचे पैसे चोरीला गेलत, आमचे पैसे तसेच आहेत. आणि ज्यांचे पैसे चोरीला गेलेत असे वाटत असेल त्यांना माझ्यासारखे करोडो लोक पैसे द्यायला तयार आहेत. राम मंदिर ही तुमच्या बापाची जहागिरी नाही. आम्ही सुद्धा रामभक्त आहोत. आणि तुम्हाला लक्षात असेल, दोन वर्षांपूर्वी २२ जानेवारीला अयोध्येत जेव्हा राम मंदिराचं लोकार्पण झालं होतं, मोदी तिकडे बसले होते. एकही शंकराचार्य त्यांच्या सोबत नव्हता. आणि तेव्हा आपण नाशिकच्या काळाराम मंदिरात होतो. ज्या काळाराम मंदिराचा इतिहास असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिरात प्रवेश, हा राम तुझा नाही हा राम माझा सुद्धा आहे आणि त्याचं दर्शन घेण्याचा अधिकार हा मला सुद्धा आहे. आणि मला तो मिळालाच पाहिजे म्हणून सत्यग्रह केला होता तेच ते राम मंदिर. आणि दुसऱ्या दिवशी २३ जानेवारीला मी जाहीर सभेत बोललो होतो. आम्ही जय श्रीराम जरूर बोलतो. जय शिवराय जय श्रीराम. पण आम्हाला राम पाहिजे तो भाजपमुक्त राम पाहिजे. त्या आंदोलनाची ही सुरुवात आहे भाजपमुक्त राम. आणि ही चोरी, हा दरोडा हा केवळ दानपेटीवरचा नाही. तर हा दोरडा तमाम हिंदूंच्या भावनेवरती, तमाम हिंदूंच्या श्रद्धेवरती घातलेला या मंदिर चोरांनी घातलेला दरोडा आहे. आणि न्यायमूर्ती तुम्ही झालं पाहिजे. या देशातला, या जगातला प्रत्येक हिंदू या चोरीबद्दल न्यायाधीश बनून त्याने न्याय निवाडा केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी जे बोलले होते, जेव्हा भिवंडीच्या आसपास एक दंगल झाली होती तेव्हा वाजपेयीजी बोलले होते की, अब हिंदू मार नही खायेगा. आता मी सांगतोय, तुम्ही कसे हिंदू झाले पाहिजेत, जे चोर आहेत त्यांना ठणकावून सांगा, आता हिंदू माफ करणार नाही. हिंदू नुसता जागा नाही, हिंदू आता पेटलेला आहे. राम म्हणजे कोणाची तुमची खासगी मालमत्ता नाहीये. इकडे सगळे रामभक्त आहेत, भाजपचं कोणी आहे? मग हिंदुत्व कोणी सोडलंय? मंदिर चोरांची बाजू घेणारा रामभक्त असू शकत नाही. म्हणून फडणवीसांना सांगायचंय की शब्दांचे खेळ करू नका. रामरक्षा येते की नाही? रामरक्षा स्तोत्र येत नसेल पण मला रामाची रक्षा करायला येते आणि ती केल्याशिवाय मी राहणार नाही. मागे हटणार नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की केवळ तुम्हा रामरक्षा म्हणता येते म्हणून तुम्हाला मंदिराची चोरी क्षम्य आहे, अजिबात नाही. तिकडे लाखो करोडो हिंदुंच्या भावनांनी बांधलं गेलेलं ते मंदिर आहे. गावागावात शिवसेनाप्रमुख फिरले आहेत, गावागावात शिवसैनिक फिरलेले आहेत. अनेकजणांनी केसेस अंगावर घेतलेल्या आहेत. पोलिसांचा मार खाल्लेला आहे. छातीवरती वळ उठला तरी मागे न हटता अयोध्येला जाणारे आमचे शिवसैनिक आहेत. आणि त्या शिवसैनिकांना सोबत घेऊन रामरक्षा म्हणण्याचं नव्हे तर राम रक्षा करण्याचा हा लढा आजपासून सुरू करतो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

चोरांनो मध्ये येऊ नका. आणि हा रामभक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे. सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात. रामभक्तांच्या बाजूला आहात की मंदिर चोरांच्या बाजूला आहात? हे फडणवीसांनी उत्तर द्यावं, भागवतसाहेबांनी उत्तर द्यावं की तुम्ही कोणाच्या बाजूला आहात? कारण तुमचं जिथे राज्य आहे त्या उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष एवढ्या मस्तवालपणे बोलत असतील आणि तुम्हाला कोणाला काही वाटत नसेल तर तुमचं हिंदुत्व हे ढोंगी आहे, आज मी तुमच्या नागपूरमधून मी तुमच्यावर आरोप करतोय, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

हा लढा केवळ नागपूर, मुंबईपुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. मी सगळ्या प्रमुख शहरात जाणार आहे. इतर राज्या सुद्धा जाणार आहे. तुम्ही जिथून जिथून आलात ज्या गावातून आलात, ज्या खेड्यातून आलात ५ असतील, ५० असतील. पण रामरक्षेचा हा लढा तुम्हाला गावोगावी खेडोपाडी नेलाच पाहिजे. कारण रामाच्या नावाने मतं मागितलेली ही लोक ज्या पद्धतीने वागताहेत, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अजूनही झालेली नाही. जसा एक जमाना होता, मंदिर वही बनायेंगे लेकीन तारीख नही बतायेंगे… तसं कर्जमुक्तीच्या बाबतीत चाललेलं आहे. निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना जाहीर केली. आता जवळपास ९२ लाख महिलांना त्यातून वगळून टाकलेलं आहे. निवडणुकीच्या आधी ज्या महिलांना साड्या देत होते, त्यांना साड्या देणं सुद्धा यांनी बंद केलं आहे. जेव्हा जेव्हा ज्याची गरज असते ती गरजेपुरता वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता तर प्रभू श्रीरामाला सुद्धा फेकून द्यायला निघालेत एवढे नीच राज्यकर्ते मी आजपर्यंत कधी पाहिले नव्हते. पण कर्तव्य आपलं आहे. त्यांना असं वाटत असेल आम्ही काही केलं तरी चालतंय. पण आम्ही चालू देणार नाही. आज सुद्धा बाळासाहेबांनी उभा केलेला कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू हा तुम्हाला जाब विचारण्साठी तुमच्या समोर उभा राहिलेला आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

ज्या प्रमाणे आजच्य आंदोलनाला मी सर्वपक्षीयांना हाक दिली होती की पक्ष बाजूला ठेवा हा हिंदुत्वाचा लढा आहे. तसंच उद्या आम्ही मुंबईमध्ये करतंय ते सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांनी जो तिकडे लढा उभारलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये मी उद्या आंदोलन करतोय. तुम्हाला शक्य असेल उद्या तुम्ही सुद्धा आंदोलन करा. अनेकांनी मला विचारलं तुम्ही दिल्लीला जाणार का? म्हटलं जरूर जाईन. पण नुसत्या कोरड्या शब्दाने मी समाधान करायला जाणार नाही. पहिले इकडे आंदोलन करेन, पहिले इकडे रस्त्यात उतरुन पाठिंबा देईन आणि मग त्यांना भेटायला जाईन. कारण सोनम वांगचुक हे गेल्या महिन्यात घरी येऊन मला भेटून गेले. अभिजीत दीपकेशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. आणि उद्याचं सुद्धा आंदोलन करतो, सर्व पक्षांच्या सर्व भाषिकांना आवाहन करतोय की, हा जो लढा जसा हिंदुत्वाचा मंदिर चोराविरुद्ध ढोंगी हिंदुत्वाविरुद्ध आहे तसाच उद्याचा लढा आपल्या देशाचे भविष्य असलेल्या युवकांसाठीचा लढा आहे. मी तिथे जातपात धर्म मानत नाही. ज्यांना ज्यांना युवकांबद्दल अस्था आहे त्या सगळ्यांनी उद्या तिथं यावं. ज्यांना ही दडपशाही चाललेली ती मंजूर नाहीये. ते सगळे जण उद्या तिकडे यावेत हे आमंत्रण सगळ्यांना देतोय, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

आजपासून रामरक्षा म्हणजे रामाचं रक्षण, मंदिराचं रक्षण हे रामभक्तांना करावं लागतंय त्या लढ्याची सुरुवात होतेय. ही ठिणगी इकडे टाकलेली आहे. ठिणगीचा वणवा राज्यभर नेण्याचा निदान विदर्भात नेण्याचं काम हे तुम्हाला करावं लागणार आहे. कारण हा विदर्भच नेहमी भरघोस मताने भाजपला निवडून आणून देत असतो. जर विदर्भाने भाजपच्या मागचा पाठिंबा काढला तर भाजप भुसकन खाली पडल्याशिवाय राहणार नाही. आणि का काढणार नाही? केवळ हिंदुत्व म्हणून नाही तर शेतकऱ्यांची फसगत होतेय, बहिणींची फसगत होतेय आणि हिंदुत्वाचं ढोंग घेऊन सत्तेवर आलेली ही लोक यापुढे आम्ही तुम्हाला मत देणार नाही. आम्ही जय शिवराय आणि जय श्रीराम बोलणारे अस्सल कट्टर हिंदू आहोत हे दाखवून द्या आणि भाजपला त्यांनी जागा दाखवून द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.