तुमच्या नेत्याची खरी पदवी दाखवा, अमेरिकेतील शिक्षण निधीच्या प्रश्नांवर अभिजित दीपके यांचे प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी वापरण्यात आलेल्या निधीवरून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माझे शिक्षण शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जातून पूर्ण झाले असल्याचे सांगत, “मी माझी शिष्यवृत्ती आणि कर्जाची कागदपत्रे दाखवायला तयार आहे, पण तुमचा नेता त्यांची खरी पदवी दाखवणार का?” असा थेट सवाल दीपके यांनी X वर शेअर केलेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून विचारला आहे.

नुकतेच गुजरातमधील सुरत येथील अमित तिवारी या माहिती अधिकार कार्यकर्त्याने दीपके यांच्या परदेशातील शिक्षणाच्या खर्चाच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. दिपके यांचे वडील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात  कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होते. त्यांचा महिन्याचा पगार ६० ते ६५ हजार रुपये असताना त्यांनी आपल्या मुलाच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा पेलला, असा प्रश्न तिवारी यांनी उपस्थित केला होता. याशिवाय खासदार कपिल सिब्बल यांनी सीजेपीच्या आंदोलकांसाठी जाहीर केलेल्या १ कोटी रुपयांच्या कायदेशीर मदत निधीवर १८ टक्के जीएसटी आकारण्यात यावा आणि सीजेपीच्या कायदेशीर नोंदणीची चौकशी व्हावी, अशी मागणी करत तिवारी यांनी निवडणूक आयोग व सीबीआयसीकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

या सर्व आरोपांना उत्तर देताना अभिजित दीपके यांनी सांगितले की, “हे लोक शिक्षणाच्या विरोधात का आहेत, हे मला समजत नाही. एका साध्या घरातील आणि सामान्य कुटुंबातील मुलगा बोस्टनसारख्या विद्यापीठात जाऊन शिकू शकतो, हे या लोकांना का बघवत नाही.”