देशातील 58 पैकी 38 व्याघ्र प्रकल्प संकटात, केंद्र सरकारचा दावा ठरला खोटा; नऊ प्रकल्पांत तर वाघच नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात वाघांची संख्या वाढली असून आता हिंदुस्थानात जगातील जवळपास 75 टक्के वाघ असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातो. परंतु दावा सपशेल खोटा ठरला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नवीन अहवालाने व्याघ्र संवर्धनातील गंभीर वास्तव समोर आणले. देशातील 58 व्याघ्र प्रकल्पांपैकी तब्बल 38 प्रकल्पांमध्ये भक्ष्य प्राण्यांची संख्या घटली आहे. याशिवाय नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी काहींमध्ये वाघच नाहीत, तर काहींमध्ये संख्या अत्यंत कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ‘रोडमॅप फॉर ऑक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ टायगर्स इन इंडिया’ या अहवालातील विश्लेषण 2022 च्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेवर आधारित आहे. 2027 मध्ये ताजी गणना जाहीर होणार आहे. या अहवालानुसार, केवळ 20 व्याघ्र प्रकल्पांमध्ये दर्जेदार अधिवास आणि पुरेसा भक्ष्यसाठा या दोन्ही बाबी समाधानकारक आहेत. त्या ठिकाणी वाघांची संख्या स्थिर आणि वाढती आहे. उर्वरित बहुतांश प्रकल्पांमध्ये भक्ष्यसाखळी, अधिवास किंवा दोन्ही बाबतीत गंभीर उणिवा आहेत. विशेष म्हणजे 58 पैकी 38 व्याघ्र प्रकल्पांमध्ये भक्ष्य प्राण्यांची कमतरता ही प्रमुख समस्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील अंदाजे 3,682 वाघांपैकी 2,338 वाघ व्याघ्र प्रकल्पांमध्ये असून 1,344 वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे हे वाघ मानवी हस्तक्षेप, अधिवास नष्ट होणे आणि शिकारीच्या धोक्याला अधिक सामोरे जात असल्याचे अहवालात नमूद आहे.
2022 च्या व्याघ्र गणनेत मिझोराममधील दाम्पा, तेलंगणातील कावल, ओडिशातील सातकोसिया, महाराष्ट्रातील सह्याद्री आणि अरुणाचल प्रदेशातील कमलांग या व्याघ्र प्रकल्पांमध्ये निवासी वाघांची नोंदच झालेली नाही.