
शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाचे प्रकरण तसेच गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या पुढील सुनावणी होणार आहे. गेल्या आठवडय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सलग दोन दिवस जोरदार युक्तिवाद केला. मंगळवारीही त्यांचा उर्वरित युक्तिवाद सुरू राहणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गद्दार शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच गद्दार आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. दोन्ही याचिकांवर सध्या सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठापुढे अंतिम सुनावणी सुरू आहे.




























































