
सांताक्रुझ पूर्व येथील गोळीबार रोड क्रमांक 8 वर गटाराच्या सफाईचे काम करताना दोन कामगार मॅनहोलमध्ये पडले. यातील एका कामगाराला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले, तर दुसऱयावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे खासगीरीत्या गटार सफाईचे काम करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गोळीबार रोड क्रमांक 8 येथील भव्या निकेतन या सोसायटीने इमारतीच्या अंतर्गत सांडपाणी वाहिनीच्या सफाईचे काम खासगी व्यक्तींना दिले होते. सफाई करताना महापालिकेच्या कर्मचाऱयांना माहिती न देता कामगारांनी मॅनहोल उघडला. यावेळी अजय ठाकूर (30) आणि संतोष काष्टे (50) मॅनहोलमध्ये पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोघांना बाहेर काढून व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. काष्टे यांना डॉक्टरांनी रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित केले, तर अजय ठाकूर याच्यावर एमआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
शिवसेनेने केली जखमीची विचारपूस
प्रभाग क्रमांक 87 येथील या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका पूजा महाडेश्वर, प्रभाग समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे व युवासेना सहसचिव डॉ. प्रांजल महाडेश्वर यांनी व्ही. एन. देसाई रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णाची व मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पूजा महाडेश्वर यांनी केली.


























































