चर्चा करण्याची हिंमत नाही म्हणून चिंधीचोर पाठवतात, आदित्य ठाकरेंचा मिंधेंना जोरदार टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनी मंगळवारी ढोल ताशांच्या गजरात, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शिवसेना नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांवर जोरदार निशाणा साधला. तसंच, महाराष्ट्राविषयी चर्चा करण्याची हिंमत नाही म्हणून घटनाबाह्य मुख्यमंत्री आमच्यावर बोलायला चिंधीचोर पाठवतात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही इथून एक साधारण माणूस उमेदवार म्हणून देत आहोत. त्यांचं आधीचं काम सगळ्यांना माहीत आहे. आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणि आमच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला जनता रस्त्यावर आली आहे.’

फोडाफोडीच्या राजकारणाचाही आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘लोकं फोडणं, पक्ष फोडणं, परिवार फोडणं ही कामं भाजप, एनडीए आणि त्यांचे ईडी-आयटी-सीबीआय या मित्रपक्षांकडून सुरूच आहे. पण महाविकास आघाडी महाराष्ट्र हिताचं बोलत आली आहे आणि आम्ही महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू.’

श्रीकांत शिंदेंवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. त्यांची लायकी तेवढीच आहे. त्यांना आम्ही जास्त किंमत देत नाही. मी कित्येक वेळा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं की माझ्यासमोर एकट्याने किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला का जाताहेत, महाराष्ट्राच विकास का रखडला आहे, कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत आहोत. याच्यावर एकट्याने किंवा खात्याने डीबेट करावं पण त्यांच्यात ती हिंमत नाहीये. मग इकडून तिकडून चिंधीचोर आमच्यावर बोलायला पाठवत असतात, असा जोरदार टोला आदित्य ठाकरे यांनी मिंधेंना हाणला.

‘जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतो, तेव्हा हिंदू-मुस्लीम विषय आणतात. आपल्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मग ती जिल्ह्यात असो किंवा जाती धर्मात असो. आपण महाराष्ट्र म्हणून सगळे एक आहोत आणि महाराष्ट्र हिताचं बोलत राहू. कारण जर ते बोललो नाही तर भाजप मंत्रालयसुद्धा सूरतला नेऊन ठेवेल.’

‘भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी प्रज्ज्वल रेवन्नांचा प्रचार केला. निवडणूक आयोग हा त्यांचा अर्ज बाद करणार आहे की नाही? तो सगळीकडेच डोळे बंद करून चालतो का? असे भयानक प्रकार घडतात तिथेही आयोग गप्प बसतो का? देशात निवडणूक आयोग आहे की नाही आणि भाजप कारवाई करणार आहे की नाही हा प्रश्न आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आज कुठे आहेत? महिला आणि बालकल्याण विभागाचे मंत्री कुठे आहेत? अशी प्रश्नांची सरबत्तीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.