आमीर खान डीपफेक व्हिडीओप्रकरणी गुन्हा दाखल

एका राजकीय पक्षाचा निवडणुकीच्या प्रचाराबाबत अभिनेता आमीर खानचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओप्रकरणी खार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

काही वर्षांपूर्वी एका वाहिनीवर आमीर खानचा कार्यक्रम प्रसिद्ध होत असायचा. त्या कार्यक्रमातील एक सीन घेऊन आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून आमीरचा डीपफेक व्हिडीओ तयार करण्यात आला. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. गेल्या वेळी आमीरने निवडणुकीबाबत जनजागृती केली होती. आपण कोणत्याही राजकीय पक्षाबाबत भूमिका घेतली नाही, असे आमीर खानच्या वतीने त्याच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

तो व्हायरल झालेला व्हिडीओ बनावट आहे. त्या व्हिडीओबाबत संबंधित यंत्रणांना कळवले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यातदेखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमीर खानच्या वतीने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.