शिवसेनेच्या दणक्यानंतर आरेच्या मुख्य कार्यकारी, अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

आरेतील रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱया आरे प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी आरेतील नागरिकांनी भीक मांगो आंदोलनदेखील केले होते. शिवसेनेच्या दणक्यानंतर अखेर राज्य सरकारने आरे प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाक्चौरे यांची तडकाफडकी बदली केली आहे.

आरेमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आदिवासी पाडय़ांमध्ये जाण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. आरे प्रशासन मात्र नागरिकांना होणारा त्रास नजरअंदाज करताना दिसत होते. आरेवासीयांना होणाऱया त्रासाच्या विरोधात शिवसेनेचे शाखाप्रमुख संदीप गाढवे यांच्या नेतृत्वाखाली 14 जानेवारी रोजी भीक मांगो आंदोलन करण्यात आले होते.

आरेमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करा, येथील नागरिकांना लाईट मीटर व घर दुरुस्तीसाठी परवानगी द्या, आरेतील मोडकळीस आलेली सरकारी निवासस्थाने व शौचालय तत्काळ दुरुस्त करा, आरेचे रुग्णालय ठेकेदाराला देण्याऐवजी आपला दवाखाना म्हणून सुरू करा तसेच आरेतील रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱया अधिकाऱयांची हकालपट्टी करा, अशी मागणी यावेळी आरेवासीयांनी केली होती