काँग्रेसच्या एका नेत्याशिवाय सर्वांना भाजपमध्ये आणणार; आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

Himanta Biswa Sarma

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या वादग्रस्त विधानाने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीआधी हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसबाबत मोठं विधान केलं आहे. काँग्रेसला मत देऊन काही फायदा नाही कारण कोणी चूकून जिंकले तरी ते भाजपमध्ये येतील, असा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेसची लोक काँग्रेसमध्ये राहतील की नाही ही पण एक शंका आहे. कारण प्रत्येकाला भाजपमध्ये यायचे आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आसामच्या करीमगंज जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना हिंमता बिस्वा सरमा यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. ते म्हणाले काँग्रेसचा कोणताही उमेदवार आता पक्षात राहायला इच्छुक नाही. सर्वांना भाजपमध्ये सहभागी व्हायचे आहे. काँग्रेसच्या एका नेत्याशिवाय जे काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील त्यांना मी भाजपमध्ये घेऊन येईन, असे ते म्हणाले. आता एकाला सोडून म्हणजे कोण याबाबतही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. हिंमता सरमा पुढे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करतील. आम्ही राज्यात अल्पसंख्यांकाच्या विकासासाठी काम करत आहोत. त्यामुळे अल्पसंख्यांक आम्हाला मतदान करतील, असा फाजील आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला.

हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सांगितले की, भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी आगामी निवडणुकीत ईशान्येकडील लोकसभेच्या 25 पैकी 22 जागा जिंकेल. आसाममधील 14 जागांपैकी सध्या फक्त तीन जागा अनिश्चित आहेत, असा दावाही येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना हिमंत सरमा यांनी केला.