आठ महिन्यांत 100 वाहनांवर कारवाई; नऊ कोटींचा दंड वसूल; सातारा जिह्यात अवैध गौणखनिज उत्खनन

सातारा जिह्यात काही प्रमाणात अवैध गौणखनिज उत्खनन सुरू होते. या अनधिकृत कामांवर गेल्या सात ते आठ महिन्यांत 100 वाहनांवर कारवाई करत त्यातून नऊ कोटींचा दंड वसूल केला आहे. नियमाप्रमाणे रीतसर परवानगी घेऊन काम केल्यास कुठलीही अडचण नाही. मात्र, नियमबाह्य काम करून कोणी गुंडागर्दी करत शासकीय अधिकारी, कर्मचा ऱ्यांस त्रास दिल्यास सोडणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला. दरम्यान, जिह्यात कोणी अवैध कामे करत असेल, तर तत्काळ बंद करावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.जिल्हाधिकारी डुडी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय कामकाज व अवैध गौणखनिज कारवाईची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, गौणखनिज अधिकारी अमृत थोरात आदी उपस्थित होते.

डुडी म्हणाले, अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतुकीवर महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूल व गौण खनिज वसुलीचे उद्दिष्ट यंदा 100 टक्के पूर्ण झाले आहे. जिह्यात अवैध गौणखनिजांमध्ये 224 कारवाई करत 100 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. जिह्यात 234 क्रशर सुरू असून, त्यांची तपासणी केली असता 57 क्रशर अनधिकृत असल्याचे समोर आले. त्यातील काही कागदपत्रे घेऊन रीतसर सुरू ठेवले आहेत. उर्वरित 43 अनधिकृत असून, ते बंद केले आहेत.

तालुकानिहाय पथकांची स्थापना
या कामांच्या तपासणीसाठी तालुकानिहाय पथके स्थापन करण्यात आली असून, नियमबाह्य कामे करणा ऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. कामांची रीतसर परवानगी घेऊन काम करावे. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद व अन्य शासकीय यंत्रणा नियमाप्रमाणे कारवाई करत असतात. प्रशासनाचे एखादी बाब चुकीची वाटत असल्यास निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

निवडणूक प्रक्रियेच्या कामांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 12 एप्रिलपासून सुरू होणार असून, 19 एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असणार आहे. या कालावधीत 14 एप्रिलला रविवार असल्याने त्या दिवशी अर्ज दाखल करता येणार नाही. 22 एप्रिलला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. या सर्व प्रक्रियांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे, तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या उमेदवारास अनामत रक्कम बारा हजार 500, तर सर्वसाधारण गटातील उमेदवारास 25 हजार रक्कम आहे. उमेदवाराने बँक खाते, मोबाईल क्रमांक, ई-मेल व पूर्ण पत्ता असलेले व निवडणूक अधिका ऱ्यांनी दिलेले पत्र भरून सादर करावे, असे आवाहन जितेंद्र डुडी यांनी केले आहे.