वाळूमाफियांविरोधात कारवाई; 11 होडय़ा नष्ट

अवैध वाळूउपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने अवैध वाळू व वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या 11 होडय़ांची कटरच्या साहाय्याने तोडफोड करून नष्ट केल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळूउपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या वाळूमाफियांविरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पथक नेमले आहे. पंढरपूर शहर, इसबावी, चिंचोली भोसे या भीमा नदीपात्राच्या हद्दीत लाकडी होडय़ांद्वारे अवैध वाळूउपसा व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली.

सकाळी महसूलच्या पथकाने नदीपात्रात कारवाई केली. या पथकातील कर्मचाऱ्यांनी दुपारपर्यंत भीमा नदीपात्रात वाळूउपशासाठी वापरण्यात येणाऱ्या 11 होडय़ा पकडल्या. या होडय़ांची कटरच्या साहाय्याने तोडफोड करून त्या नष्ट केल्या. कारवाई केलेल्या पथकात मंडलाधिकारी विजय शिवशरण, पंढरपूर मंडळातील तलाठी अमर पाटील, मंडलाधिकारी राजेंद्र वाघमारे, प्रमोद खंडागळे, महेश कुमार सावंत, गणेश पिसे सहभागी झाले होते.