मिंधे – भाजप सरकारची मुंबईवर एवढी खुन्नस का? आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल

नगरसेवकांचा कालावधी संपल्यामुळे मुंबई महापालिकेचा कारभार गेल्या दीड वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून राज्यातील मिंधे-भाजप सरकार हाकत आहे. 24 पैकी 11 वॉर्डमध्ये पूर्ण वेळ वॉर्ड अधिकारी नाहीत तर 16 वॉर्ड अधिकारी आपल्या नियुक्तीची वाट पाहत आहेत. सत्तेवर असलेल्या खोके सरकारने मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराची अवस्था पार बिकट करून ठेवली आहे. मिंधे-भाजप सरकारची मुंबईवर एवढी खुन्नस का, असा सवाल शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर विचारला आहे.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्यावाढीमुळे प्रशासकीय सुविधेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डची संख्या 227 वरून 236 करण्याचा निर्णय घेतला, मात्र सत्तेवर येताच मिंधे सरकारने हा निर्णय बदलला. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वोच्च न्यायालयात गेली. सर्वोच्च न्यायालयाने 227 वॉर्डनुसार निवडणुका घेण्यास कोणतीही बंदी घातलेली नाही, मात्र तरीही सरकार मुंबई महापालिकेची निवडणूक घ्यायला टाळाटाळ करत आहे. पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपली. त्यानंतर मुंबई महापालिकेवर गेल्या दीड वर्षापासून प्रशासक आहे. या प्रशासकाच्या माध्यमातून मिंधे सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे.

सर्व्हेच्या अंदाजामुळे निवडणुकीला टाळाटाळ

2011 ला जनगणना झाल्यानंतर कोरोना काळामुळे जनगणना झाली नाही. त्यामुळे काही सर्वेक्षण संस्थांच्या अंदाजानुसार तीन टक्के लोकसंख्या वाढीचा अंदाज धरून महाविकास आघाडी सरकारच्या काळात 227 वॉर्डची संख्या 236 करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र मिंधे सरकारने केलेल्या काही सर्व्हेमध्ये त्यांना निवडणुकीत यश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मिंधे सरकार मुंबई महापालिकेची निवडणूक सातत्याने टाळत आहे.