केजरीवालांच्या अटकेचा मुद्दा जागतिक पातळीवर; अमेरिका, जर्मनीनंतर आता संयुक्त राष्ट्रांची प्रतिक्रिया समोर

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली. गुरुवारी ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत 4 दिवसांची वाढ केली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केजरीवाल यांच्या अटक केल्याने विरोधक आक्रमक झाले असून याविरोधात 31 मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीची महारॅलीही होणार आहे. केजरीवाल यांच्या अटकेवरून देशभरात गोंधळ सुरू असताना त्यांच्या अटकेचा मुद्दा आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे. अमेरिका, जर्मनीनंतर आका संयुक्त राष्ट्रांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Arvind Kejriwal यांच्या अटकेनंतर अमेरिका आणि जर्मनीने टिप्पणी केली होती. यावर हिंदुस्थानने विरोधही व्यक्त केला होता. आता संयुक्त राष्ट्रांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. निष्पक्ष निवडणूक व्हावी आणि सर्वांच्या अधिकाराचे रक्षण व्हावे, असे संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या पत्रकार परिषदेदरम्यान बांगलादेशमधील एका पत्रकाराने हिंदुस्थानमधील परिस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीवेळी अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक आणि काँग्रेसची खाती गोठवण्याचा मुद्दा पत्रकाराने उपस्थित केला. याला संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्यांनी उत्तर दिले. आम्हाला आशा आहे की हिंदुस्थान असो किंवा जगातील अन्य कोणताही देश असो, प्रत्येकाच्या अधिकार आणि हक्कांचे संरक्षण केले जाईल. तसेच प्रत्येक जण मुक्त आणि निष्पक्ष वातावरणामध्ये मतदान करू शकेल. निवडणूक निष्पक्ष होईल, असे ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

याआधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनीही केजरीवाल यांच्या अटकेवर टिप्पणी केली होती. केजरीवाल यांच्या अटकेवर आमचे लक्ष असून याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे असे त्यांनी म्हटले होते. अमेरिकेच्या या टिप्पणीवर हिंदुस्थानने तातडीने भाष्य केले होते. आमच्या देशातील कायदेशीर कारवाईवर अणेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे विधान चुकीचे असून प्रत्येक देश एकमेकांच्या देशांतर्गत समस्या आणि सार्वभौमत्वाचा आदर करतील अशी अपेक्षा आहे नाहीतर अव्यवस्था वाढेल, असे हिंदुस्थानने म्हटले होते. त्यानंतरही अमेरिकेने आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)