कोणता शेअर खरेदी कराल, कोणता विकाल ? AI देणार शेअर बाजार व्यवहारांची इत्यंभूत माहिती

कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात ए.आय.चा विविध क्षेत्रातील वापर वाढायला लागला आहे. मशिन लर्निंग, ए.आय.च्या वापरामुळे अनेक गोष्टी सुलभ होण्यास मदत होऊ लागली आहे. शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्यांनीही या तंत्रज्ञानाचा आपल्यासाठी वापर करण्यास सुरुवात केली आहे. शेअर बाजाराशी निगडीत व्यक्ती, ए.आय. आधारीत माहितीच्या आधारे सहजपणे व्यवहार करू शकतात. ज्यांना शेअर बाजाराबद्दल माहिती नाही अशांसाठी ए.आय.च्या मदतीने व्यवहार करणे सोपे जाणार आहे. कोणता शेअर निवडावा, तो किती रुपयांना खरेदी करावा, किती रुपयांना विकावा याची संपूर्ण माहिती विविध सॉफ्टवेअरद्वारे दिली जात आहे. ऑप्शन ट्रेडींग करणाऱ्यांसाठीही ही सुविधा मिळत असून कॉल आणि पुट खरेदी करणाऱ्यांसाठी यामध्ये सविस्तर माहिती आणि पर्याय दिलेले असतात. पैसे भरून तुम्ही ही सॉफ्टवेअर विकत घेऊ शकता.

मुंबईतील गोरेगावातील नेस्को ग्राऊंडमध्ये एएनएमआय या संघटनेने स्टॉकटेक नावाच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी झालेल्या निओट्रेडर नावाच्या कंपनीचे आदित्य अय्यर यांनी सांगितले की इंट्राडे व्यवहारांसाठी त्यांच्या सॉफ्टवेअरमधून मिळणाऱ्या टीप्सची अचूकता ही 60 ते 70 टक्के इतकी आहे. ए.आय किंवा त्यापेक्षाही प्रगत तंत्रज्ञान आलं तरी ते मनुष्याच्या बुद्धीमत्ता आणि भावनांची जागा कधीच घेऊ शकत नाही आणि असे अय्यर यांनी म्हटले. ए.आय अचूक माहिती देऊ शकतो मात्र निर्णय घेण्याची क्षमता ही मानवाची आणि ए.आयची पूर्णपणे भिन्न असते त्यामुळे या दोन्हीचा मिलाफ करून जर शेअर बाजारात व्यवहार झाले तर त्यातून अधिक फायदा होईल असे त्यांनी सांगितले. सी.के.नारायण हे शेअर बाजारातील तज्ज्ञ असून त्यांच्या आकलनाच्या आधारे हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे ज्याला आता ए.आयची जोड देण्यात आली आहे असे अय्यर म्हणाले.