आळंदी मंदिरातून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 29 जूनला प्रस्थान, पालखी सोहळा दिंडी समाज बैठकीत निर्णय

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार 29 जून 2024 रोजी आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असून पहिला मुक्काम आळंदीतील गांधी वाड्यातील दर्शनबारी मंडपात होणार आहे. यावर्षी पुणे येथे (दि. 30 जून व 1 जुलै) व सासवड (दि. 2 व 3 जुलै) येथे सोहळ्याचा दोन दिवस तसेच लोणंदला अडीच दिवस सोहळा मुक्कामी राहणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याचे माऊलींचे पालखी सोहळा प्रमुख व देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी सांगितले.

पंढरपूर येथील आळंदी देवस्थानच्या माऊली मंदिर मठात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली परंपरेने उत्साहात झाली. या बैठकीस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्थ ॲड. राजेंद्र उमाप, आळंदी देवस्थान नियुक्त पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त योगी निरंजननाथ, ह. भ. प. विठ्ठल महाराज वासकर , नामदेव महाराज वासकर, राणु महाराज वासकर, माऊली महाराज जळगांवकर, अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी, उपाध्यक्ष भाऊसाहेब फुरसुंगीकर, राजाभाऊ थोरात, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे यांच्यासह विविध दिंडी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत नवनियुक्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्थ ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांचा दिंडी समाज संघटने तर्फे सत्कार करण्यात आला. या बैठकीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी पालखी सोहळ्याचे पत्रिकेचे वाचन करून उपस्थितांना माहिती दिली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी माहिती दिली. ते म्हणाले, श्रींचे पालखी प्रस्थान आळंदी मंदिरातून शुक्रवारी 29 जूनला होईल. पुणे आणि सासवडला दोन दिवस तसेच लोणंद येथे सोहळ्याचा अडीच दिवस मुक्काम राहील. मंगळवारी 16 जुलैला पंढरपूर मुक्कामी सोहळा येईल. बुधवारी 17 जुलैला आषाढी एकादशी परंपरेने पंढरपूर मध्ये साजरी होणार आहे.

पालखी सोहळ्याचे प्रवासा दरम्यान पुण्यात संगमवाडी ते भवानी पेठ तसेच निंबोरे ओढा ते फलटण विमानतळ हे अंतर पायी वारीतील वाटचालीस खूप जास्त आहे. यामध्ये सुवर्णमध्य काढून पालखी सोहळ्याला अर्ध्या तासाचा विसावा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. ह. भ. प. राजाभाऊ थोरात आणि नामदेव महाराज वासकर यांनी मागणी केली आहे. प्रवासात विसावा वाढला तर रात्रीच्या समाज आरतीस उशीर होतो. या बाबत विचार करून नियोजन करण्याची मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली आहे.

आळंदी ते पंढरपूर या पायी वारी प्रवासात विसाव्यास जागा नसल्याने शासनाने रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. यावर्षी वाखरी ते पंढरपूर या रस्त्याचे काम सुरु आहे. पालखी तळ खाली तसेच रस्ता वर झाला आहे. यामुळे वाहनांना अडचण येणार असल्याने नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बाबत बरड, वेळापूर, भंडीशेगाव येथे वाहनांची अडचण येणार आहे. आळंदी – पंढरपूर हा पालखी मार्ग नसून महामार्ग झाला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याचे प्रवासास अडचण निर्माण झाली आहे असल्याने प्रशासनाने लक्ष घालून मार्ग काढण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे. याशिवाय दुष्काळी परिस्थिती, पाण्याची समस्यां असल्याने सोहळ्यात पिण्याचे पाण्याची व्यवस्था प्रभावी पणे करण्याची मागणी देवस्थान तर्फे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी या बैठकीत केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूचना, मागण्या करीत बैठकीतील चर्चेत भाग घेतला. सोहळ्याचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल असे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.