जलसंधारणतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना चिरमुले ट्रस्टचा पुरस्कार जाहीर

युनायटेड वेस्टर्न बँकेचे संस्थापक (कै.) वा. ग. चिरमुले यांच्या स्मरणार्थ ‘वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे ‘अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार’ जलसंधारणतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना जाहीर झाला आहे.

धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या (कै.) लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृहात रविवारी (दि. 31) होणाऱया कार्यक्रमात उद्योजक फरोख कूपर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

दरवर्षी तंत्रज्ञान, बँकिंग, विमा, अर्थशास्त्र्ा आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात अमूल्य सेवा देणाऱया उत्कृष्ट व्यक्तींचा ट्रस्टतर्फे सन्मान केला जातो. डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना जलसंधारण आणि त्याचे व्यवस्थापन, निसर्ग पुनरुत्पादन, पर्यावरण आणि सामाजिक कार्यक्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल 2022 च्या चिरमुले पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

यापूर्वी चिरमुले ट्रस्टने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शास्त्र्ाज्ञ विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, रतन टाटा, राहुल बजाज, डॉ. सी. रंगराजन, गुलजार, डॉ. सायरस पूनावाला आदी मान्यवरांना या पुरस्काराने गौरविले आहे.

हा पुरस्कार सोहळा रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्या उपस्थितीत कराड अर्बन बँकेचे प्रमुख सुभाषराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त दिलीप पाठक, अनिल पाटील, डॉ. अच्युत गोडबोले, समीर जोशी, अरुण गोडबोले यांनी दिली.