अनुज थपनच्या आईची हायकोर्टात धाव; आत्महत्येची सीबीआय चौकशीची मागणी

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱया आरोपी अनुज थपनच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

थपनची आई रिटा देवी यांनी ही याचिका केली आहे. पोलिसांनी अमानुषपणे अनुजला मारहाण केली. त्याला त्रास दिला. अनुजची पोलीस कोठडीत हत्याच झाली आहे, असा दावा याचिकेत केला आहे. सलमानच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी अनुजला थर्ड डिग्री दिली. त्यातच अनुजाच मृत्यू झाला. नंतर ही संपूर्ण घटना आत्महत्या असल्याचे भासवल्याचा आरोप याचिकेत केला.

24 एप्रिल ते 2 मे 2024 पर्यंतचे पोलीस कोठडीतील सीसीटीव्ही फुटेज व पोलिसांचे कॉल डेटा सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अनुजचे नव्याने शवविच्छेदन करावे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.