जोडीनं करूया डाएट

>> अर्चना रायरीकर, आहारतज्ञ

आजकाल खूप नवराबायको एकत्र डाएट करतात. हे बदलणारे चित्र नक्कीच खूप आशादायक आहे.

 नवराबायकोची डाएट हिस्ट्री जरी वेगवेगळी घेतली आणि मेडिकल हिस्टरी जरी वेगळी घेतली तरी साधारण एका पठडीतला डाएट प्लॅन करता येतं. त्यामुळे बायकोला करायला ते खूप सोपं जातं. स्वतःचं पथ्य सांभाळताना तिला नवऱयाचे पथ्यदेखील सांभाळता येते.

 समुपदेशन किंवा काऊन्सिलिंग एकदमच करता येते. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त वेळ वापरता येतो आणि जास्त वेळामध्ये अनेक गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगता येतात. इतर कुटुंबीयांनाही या गोष्टींचा फायदा होऊ शकतो.

साधारणतः अशा प्रकारची जोडपी म्हणजे  ज्यांचं लग्न ठरलेलं आहे तेदेखील येतात.   कारण त्यांना लग्नामध्ये फिट दिसायचे असते आणि एकमेकांना ते प्रोत्साहितही करतात. शिवाय डेटिंग आणि केळवणं हे त्यांना सांभाळायचं असतं. त्यातही त्यांना एकमेकांना सांभाळून घेता येतं.

आहाराबरोबरच एकत्र जिमला जाणारीदेखील जोडपी आहेतच. एकत्र व्यायाम करतानादेखील एकमेकांना प्रोत्साहित करता येणं सहज शक्य आहे.

 एक जोडपं होतं… तसं बघितलं तर त्यांचं वजन खूप जास्तही नव्हतं आणि त्यांना वैद्यकीय समस्याही नव्हत्या. त्यांनी जे सांगितलं ते फार महत्त्वाचं होतं. नवरा म्हणाला की, आता आमची मुलगी कॉलेजला जायला लागली आणि आता आम्हाला असं वाटतं की, आम्ही सर्वार्थाने  आयुष्यात स्थिरस्थावर झालेलो आहात.  आता यापुढचा काळ आरोग्यासाठी देणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आम्हाला पुढचे आजार टाळता कसे येतील हे पहायचं आहे.

आम्हाला कुठल्याही पद्धतीने अमुक महिन्यात अमुक वजन कमी करायचं नाही, तर जे काही करायचं आहे ते दीर्घकालीन करायचे आहे आणि त्यामुळे आमच्या मुलीच्या आहारातदेखील काही सुधारणा करता आली तर तेदेखील  पहायचं आहे.

 चांगलं आहे, काळ बदलतो आहे.  काही गोष्टींबाबत तोंडावर आणि मनावर ताबा ठेवणे आणि चांगल्या आहाराची सवय स्वतःला लावून घेणे हे सारं खूप सोपं नाही, पण हेच आपल्या साथीला कोणी असेल तर हे करणे अधिक सोपं होतं हे नक्की.  कधी सगळेच कपल्स नवरा-बायको नसतात, तर काही आई, मुलगी, सासू-सून, मैत्रिणी-मैत्रिणी अशा जोडय़ादेखील असतात.

 एकमेकांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे!

अशी काही जोडपी मी बघितलेली आहेत की, ज्यांनी एका महिन्यातच 12 ते 13 किलो वजन कमी केलं आणि डाएटचे समुपदेशन झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन खूप वेगवेगळ्या रेसिपीज करून बघितल्या… आणि एकमेकांना प्रोत्साहित करत वजन कमी केलं.