लेख – कॅनडामध्ये प्रवेश : ‘खलिस्तान बोगी’चा वापर

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

सत्तेत राहण्याकरिता सध्याचे कॅनडाचे पंतप्रधान खलिस्तानी आणि दहशतवादी यांचा गैरवापर करत आहेत आणि भारताच्या विरोधात भूमिका घ्यायला तयार आहेत. मात्र पाकिस्तानप्रमाणेच कॅनडालासुद्धा कळेल की, ज्या उग्रवादी किंवा दहशतवाद्यांना ते आश्रय देत आहेत, केव्हा तरी ते कॅनडावरच उलटतील. भारताच्या पंजाबमध्ये खलिस्तान बनणे अशक्य आहे. मात्र अत्यंत विरळ लोकसंख्या असलेल्या कॅनडामध्ये खलिस्तान नक्कीच बनू शकतो.

कॅनडा हा उत्तर अमेरिकेत असलेला सुमारे 99.8 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने जगात दुसरा मोठा खंडप्राय देश आहे, पण कॅनडाची लोकसंख्या 3.76 कोटी म्हणजे अत्यंत विरळ आहे. नॉर्थ कॅनडा म्हणजे उत्तर कॅनडा हा अतिशय बर्फ पडणारा, अती थंड आणि अत्यंत कमी लोकसंख्या असलेला भाग आहे. गेल्या वीस वर्षांपासून कॅनडा झीरो पॉप्युलेशन ग्रोथमध्ये अडकलेला आहे. म्हणजे कॅनडाचा मृत्युदर मोठा आहे, परंतु जन्मदर अतिशय कमी आहे. म्हणूनच कमी होणाऱया लोकसंख्येवर कंट्रोल करण्याकरिता कॅनडाने युरोपप्रमाणेच बाहेरच्या देशातील लोकांना कॅनडात येणे, कॅनडामध्ये सेटल होणे किंवा कॅनडाचे नागरिकत्व मिळवणे अत्यंत सोपे केलेले आहे. कारण दरवर्षी नवीन लाखो परदेशी नागरिकांची कॅनडाला गरज असते. मात्र हे नागरिक सुशिक्षित असावेत आणि कॅनडाला गरज असणाऱया भागामध्ये काम करणारे असावेत. प्रत्येक वर्षी असे ठरवले जाते की, पुढच्या वर्षांमध्ये कॅनडाला कुठल्या कुठल्या क्षेत्रात कौशल्यपूर्ण नागरिकांची किंवा तरुणांची गरज आहे. त्याप्रमाणे किती नवीन परदेशी नागरिकांना कुठल्या क्षेत्रात कॅनडामध्ये प्रवेश करू द्यायचा हे ठरते.

मात्र पंजाबमधले अनेक युवक शिक्षण कमी असल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे कायदाबाहय़ पद्धतीचा वापर करतात. आज पंजाबमध्ये अनेक एजंट्स आणि संस्था आहेत, ज्या पंजाबमधल्या युवकांना कॅनडामध्ये प्रवेश करण्यामध्ये मदत करतात. मात्र पुष्कळशी मदत ही कायद्याच्या चौकटीमध्ये नसते. उदाहरणार्थ, काही आठवडय़ांपूर्वी बातमी आली होती की, पंजाबमधून कॅनडामध्ये शिकण्याकरिता आलेले चार हजार विद्यार्थी हे बेकायदेशीरपणे आले होते आणि त्यांना कॅनडाचे सरकार परत पाठवत आहे.

अनेक युवक खोटी सर्टिफिकेट घेऊन येतात. दाखवतात की, आपले शिक्षण खूप जास्त झालेले आहे. याशिवाय त्यांना सांगितले जाते की, तुमच्या ऑप्लिकेशनमध्ये तुम्ही असे दाखवा की, तुमच्यावर पंजाबमध्ये अत्याचार होत आहेत आणि तुमच्या मानवाधिकाराचे हनन होत आहे. म्हणून भारतातील जुलमी राजवटीमधून सुटण्याकरिता तुम्ही कॅनडामध्ये आश्रय घेण्याकरिता येत आहात. कॅनडा एक उदारमतवादी देश म्हणून अशा नागरिकांना कॅनडामध्ये प्रवेश देतो.

पंजाबमधील अनेक गुन्हेगार,तस्करी करणारे पंजाब पोलिसांपासून वाचण्याकरिता कॅनडामध्ये येऊन राहतात. नंतर खलिस्तानी उग्रवादी संघटनांमध्ये सामील होऊन आपले खरे रूप लपवायचा प्रयत्न करतात. असे शेकडो गुन्हेगार आज कॅनडामध्ये स्थायिक झालेले आहेत. कॅनडामधील तीसहून जास्त नागरिकांना दहशतवादी किंवा गुन्हेगार म्हणून भारताने घोषित केले आहे. त्यांना इंटरपोलद्वारे नोटीस पण देण्यात आलेली आहे. मात्र कॅनडा सरकार त्यांच्यावर मतपेटीच्या राजकारणाकरिता कारवाई करायला तयार नाही. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने आता भारतीय कायद्याच्या अंतर्गत अशा गुन्हेगारांची संपत्ती जप्त केली आहे.

अनेक वर्षांपासून पंजाबमध्ये अफू, गांजा, चरस यांचे प्रमाण फार वाढलेले आहे. 2022च्या आकडेवारीप्रमाणे पाकिस्तानने 288हून जास्त ड्रोन्स पंजाबमध्ये ड्रग्ज घेऊन पाठवली. खरा आकडा याहून खूप जास्त आहे. यामधील केवळ पाच किंवा सहा ड्रोन्समधील अफू आपल्याला पकडता आली. बाकीची गायब झाली. नशेचे प्रमाण पंजाबमध्ये खूपच वाढलेले आहे. काही वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता, ज्याचं नाव होतं ‘उडता पंजाब’. यामध्ये अफू, गांजा, चरसमुळे पंजाबी युवकांची अवस्था कशी भयानक झाली आहे याचे चित्रण होते. सरकारी आकडय़ाप्रमाणे वीस लाखांहून जास्त पंजाबी युवक हे नशेच्या आहारी गेले आहेत आणि त्यामुळे लाखो कुटुंबे नष्ट झालेली आहेत. म्हणून पंजाबमधील अनेक कुटुंबे आपल्या तरुण युवकांना नशेपासून वाचवण्याकरिता पंजाबमधून बाहेर पाठवतात. पंजाबमध्ये श्रीमंती खूप आहे. तिथली जमीन अत्यंत सुपीक आहे, परंतु पंजाबचे युवक शेती करू इच्छित नाहीत. पंजाबची शेती ही बिहारी किंवा बांगलादेशींकडून केली जाते. पंजाबमधील कुटुंबे आपली महागडी शेतजमीन विकून कॅनडामध्ये जाण्याकरिता मोठय़ा प्रमाणामध्ये एजंट्स किंवा संस्थांना पैसे देतात. त्यामुळे कॅनडात जाऊन स्थायिक होणे हा पंजाबमध्ये एक मोठा उद्योगधंदा बनला आहे. कॅनडामध्ये स्थायिक झालेले जेव्हा पंजाबमध्ये सुट्टीकरिता परत येतात, त्या वेळेला ते आपली श्रीमंती दाखवतात. अनेक गाडय़ांवर कॅनडाचे झेंडे लागलेले असतात. त्यामुळे इतर युवक त्यांच्या या दिखाऊ श्रीमंतीला भाळतात आणि त्यांची कॅनडामध्ये जाण्याची इच्छा अजून तीव्र होते.

भारतामधून कॅनडामध्ये शिकायला जाणाऱया विद्यार्थ्यांची संख्या ही लाखांमध्ये आहे. कॅनडामधल्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण 40 ते 45 टक्के एवढे मोठे आहे. आज कॅनडाला प्रत्येकच क्षेत्रामध्ये युवकांची गरज पडते, जी ते केवळ परदेशातून आलेल्या नागरिकांच्या मदतीने पुरी करू शकतात. म्हणून कॅनडाने नागरिकत्व मिळवण्याचे आपले धोरण अतिशय सैल असे केलेले आहे.

सत्तेत राहण्याकरिता सध्याचे कॅनडाचे पंतप्रधान खलिस्तानी आणि दहशतवादी यांचा गैरवापर करत आहेत आणि भारताच्या विरोधात भूमिका घ्यायला तयार आहेत. मात्र पाकिस्तानप्रमाणेच कॅनडालासुद्धा कळेल की, ज्या उग्रवादी किंवा दहशतवाद्यांना ते आश्रय देत आहेत, केव्हा तरी ते कॅनडावरच उलटतील. पंजाबच्या एका पूर्व पोलीसप्रमुखाने एका मुलाखतीत म्हटले होते की, ब्रिटिश कोलंबियामध्ये जिथे त्यांची सत्ता आहे, त्यालाच ते खलिस्तान म्हणून घोषित करू शकतील. जगमितसिंग ब्रार यांचा पक्ष सध्या कॅनडामध्ये तिसऱया स्थानावर आहे. कॅनडाच्या लोकसंख्येत शिखांची लोकसंख्या 2.5 टक्के एवढीच आहे, श्री. जगमितसिंग यांच्या पक्षाचे 22 खासदार आहेत आणि त्यांच्या समर्थनामुळे कॅनडाचे सरकार सत्तेत आहे. आता जगमितसिंग कॅनडाचे पंतप्रधान बनण्याची स्वप्नं बघत आहेत.

[email protected]