उत्स्फूर्त अभिनयाचा आनंद…

>> शब्दांकन – गणेश आचवल

सध्या सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ‘दबंगी – मुलगी आई रे आई ’ ही मालिका लोकप्रिय होत आहे. या मालिकेच्या निमित्ताने ‘बेला’ ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री यशश्री मसुरकर हिच्यासोबत साधलेला संवाद.

यशश्री, तुझ्या या मालिकेतील भूमिकेबद्दल काय सांगशील?

मी ‘दबंगी – मुलगी आई रे आई’मध्ये ‘बेला’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. बेला ही एका पोलीस इन्स्पेक्टरची बायको आहे. बेलाच्या भूमिकेला अनेक पैलू आहेत. तिचा नवऱयावर खूप विश्वास आहे. तिचा नवरा एक प्रामाणिक इन्स्पेक्टर आहे. बेला स्वतः खूप समंजस आहे. या भूमिकेत मातृत्वाची भावनासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मांडली आहे. शिवाय बेला एक शिक्षिका पण आहे आणि विद्यार्थ्यांवर सुद्धा ती माया करणारी आहे. हा पैलूसुद्धा पुढे काही दिवसात तुमच्यासमोर येईल.

मालिकेच्या सेटवरची एखादी आठवण

आमच्या या मालिकेत मला बालकलाकारांसोबत सुद्धा काम करायचे आहे. आर्या (माही भद्रा), झिया (नॅन्सी) आणि तन्मय (हित शर्मा) ही तिन्ही मुलं इतकी सुंदर काम करतात की त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने खूप आनंद होतो. शिवाय त्यांच्या उत्स्फूर्त आणि नैसर्गिक अभिनयाने आपल्या रिअॅक्शन्ससुद्धा बदलतात. सेटवर या मुलांसोबत मी नाव, गाव, फळ, फूलसारखे खेळ पण खेळते. आम्ही एकदा तर सेटवर क्रिकेटसुद्धा खेळलो होतो. लहान मुलांसोबत अभिनय करताना एक वेगळी ऊर्जा मिळत असते.

एका सौंदर्य स्पर्धेतसुद्धा भाग घेऊन तू यश मिळवले होतेस, याबद्दल काय सांगशील?

एका सौंदर्य स्पर्धेत मी सेकण्ड रनर अप होते. सौंदर्याच्या बाबतीत मी एक मुद्दा असा सांगेन की, बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक गुणांचे सौंदर्य हे अधिक महत्त्वाचे आहे आणि बुद्धिमत्ता हे खरे सौंदर्य आहे, असेदेखील मी सांगेन.

रेडिओ जॉकी म्हणून काम करतानाचा अनुभव कसा होता?

मी ‘रेडिओ मिरची’ या एफएम चॅनलकरिता पहिला मराठी कार्यक्रम सादर केला. तो कार्यक्रम ‘ऑटोरानीचा शो’ या नावाने लोकप्रिय होता. माझ्या व्यक्तिमत्त्वातील निवेदनाचे पैलू या कार्यक्रमामुळे विकसित झाले. एक वेगळा आनंद त्या कार्यक्रमातून मिळत होता.

तू रिक्षा चालवतेस आणि तू अनेक ठिकाणी असा प्रवास केला आहेस, त्याविषयी सांग.

माझ्या एका परदेशी मित्राने सायकलवरून जगप्रवास केला होता. ती प्रेरणा घेऊन आम्ही दोघांनी मिळून रिक्षा विकत घेतली आणि या रिक्षातून आम्ही आगऱयापर्यंत प्रवास केला. गोवा येथेदेखील मी रिक्षा घेऊन गेले होते. आजही अनेक वेळा सेटवर जाताना मी स्वतःची रिक्षा घेऊन जात असते. माझ्या रिक्षाने मी केलेल्या प्रवासाचे व्हिडीओसुद्धा खूप लोकप्रिय झाले आहेत.