मित्राच्या लग्नात दिसा हटके

>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)

मित्र किंवा मैत्रिणीच्या लग्नाच्या प्रसंगी ड्रेस, दागिने व काय काय खरेदी करावे आणि ते कसे घालावे याबद्दल अनेक वेळा गोंधळ उडालेला असतो. याबाबत जाणून घेऊ या काही खास टिप्स.

लग्न मित्र किंवा मैत्रिणीचे असो, आपणही तेवढेच सुंदर दिसले पाहिजे असा प्रत्येकाचाच हट्ट असतो आणि त्याप्रमाणे ते तयारही होत असतात. जर ते जवळच्या मित्र-मैत्रिणीचे लग्न असेल तर मात्र तुमचा स्वतःचाही लुक हटके असण्याकडे तुमचे जास्त लक्ष असते. कारण वधू-वरानंतर सर्वांच्या नजरा तुमच्याकडेही असतात.

अलीकडच्या लग्नांमध्ये हळदी, मेहंदी, संगीत, लग्नाचे विधी तसेच रिसेप्शन असे वेगवेगळे फंक्शन्स असतात आणि त्यासाठी मग वेगवेगळय़ा थीम वापरल्या जातात. यामध्ये बऱयाच वेळा बॉलीवूड पार्टी, युरोपियन थीम, फ्रेंच थीम, नाइट इन द वूडस किंवा डान्स पार्टी व त्याच्यामध्ये इंडियन रॉयल्टी अशी विविध प्रकारची नावे या समारंभाला दिली जातात. या समारंभामध्ये वधू आणि वर कोणते कपडे घालणार, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणाऱया मंडळींनी कोणत्या रंगांचे कपडे घालावेत यासाठी काही सूचना दिलेल्या असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला तयार व्हायचे असते. मग अशा वेळेस त्या रंगांचे कपडे घेण्यापासून,  ज्वेलरी, सँडल, चप्पल या सगळय़ांचीच तयारी करावी लागते. आजकाल न्यूड कलरचा खूप ट्रेंड आहे.  न्यूड कलरचे कपडे किंवा न्यूड मेकअप बऱयाच वेळा छानही दिसतो.

  • मेहंदीसाठी गडद रंगाचे कपडे किंवा ड्रेस वापरू शकता.  अगदी लाल, राणी कलर तसेच लाल रंगाचा सिल्क गाऊन, हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाचा ड्रेसचा वापर करू शकता. या ड्रेसेसवर तुम्ही गोल्डन ज्वेलरी किंवा नुसतेच कानातले असाही पर्याय ठेवू शकता. हेवी मेकअप छानच दिसतो.
  • हळदीसाठी वधूसोबत पिवळय़ा रंगाचा ड्रेस, साडी, कुर्ता-  घालण्याची पद्धत आहे. हिरव्या रंगाचा ड्रेस, न्यूड लिपस्टिक असा पर्याय निवडला तर तुमचाही लुक हटके दिसेल.
  • लग्नाच्या विधीच्या वेळेस खास टेडिशनल कपडे वापरले जातात. अशा वेळेस वधू किंवा वर ज्याप्रकारे कपडे घालणार असतात त्याच प्रकारे तुम्हालाही कपडे घालावे लागतात. अशा वेळेस नऊवारी साडी, सहावारी साडी, गुजराती साडी, बेंगॉली साडी, लेहंगा, अनारकली ड्रेस असे ड्रेस घालून  त्यावर हेवी मेकअप छान दिसतो.
  • लग्नाच्या रिसेप्शनच्या वेळेस वधू किंवा वर अनेक वेळा गाऊन, ब्लेझर, मग बनारसी साडी आणि ब्लेझर असा लुकमध्ये असतात. त्या वेळेस तुम्हालाही त्यांच्याप्रमाणे तुमचा लुक निवडावा लागतो. हा लुक निवडताना जर रिसेप्शन संध्याकाळच्या वेळेस असेल तर मात्र तुम्ही डार्क रंगाचा वापर केला, हेवी ज्वेलरी घातली तर चालते.
  • संगीत पार्टीमध्ये बऱयाच वेळेस वधू किंवा वराकडून जी थीम तयार केलेली असते त्याप्रमाणे तुम्हाला ड्रेसेस निवडावे लागतात. तशा प्रकारचे ड्रेसेस निवडत असताना तुम्ही ब्लेझर, जॅकेट, कलरफुल ड्रेस किंवा मुली राजस्थानी लेहंगा,  वर्कवाला लेहंगा तसेच  सिंगल कलरचा सूट, मग मल्टी कलरचा लेहंगा अशा प्रकारचा पोशाख निवडू शकता.

 [email protected]