मुद्दा – पूल पूर्ण; समस्या कायम!

> > श्रीकृष्ण हरचांदे

मुंबईतील लोअर परळ येथील पूल अलिकडेच नवीन बांधण्यात आला आहे. अत्यंत धिम्या गतीने सुमारे चार ते पाच वर्षांनंतर बांधून झाल्यानंतर अलीकडेच हा पूल खुला करण्यात आला. वास्तविक रेल्वे मार्गावरून जाणारा या पुलाचा भाग कमकुवत असल्याने फक्त तोच नव्याने बांधण्यात आला असता तर आर्थिक व वेळेची बचत झाली असती असे विचार अनेकांनी व्यक्त केले होते. करीरोडपासून लोअर परळपर्यंत व लोअर परळपासून रेल्वे वर्कशॉप आणि वरळीपर्यंत जाणारा पूल हा भरीव असल्याने तो कमकुवत असण्याचा प्रश्नच नाही, अशी शंकाही अनेक जण व्यक्त करीत होते. या भरीव पुलाची फक्त डागडुजी/दुरुस्ती केली असती व रेल्वे मार्गावरून जाणारा भाग कमकुवत असल्याने फक्त तोच भाग नव्याने बांधला असता तर आर्थिक व वेळेची बचत झाली असती. बांधकामासाठी दीर्घवेळ वाया गेल्याने स्थानिकांबरोबरच मध्य व पश्चिम रेल्वेच्या असंख्य प्रवाशांची गैरसोय झाली नसती. पुन्हा लोअर परळचा हा पूल दुरुस्त करताना पूर्वीच्या पुलावर कोणकोणत्या सोई उपलब्ध होत्या याचा विचारच केला गेलेला नाही. त्यामुळे पादचारी व असंख्य रेल्वे प्रवासी यांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली. या पुलावर पूर्वी असलेले दोन्ही बाजूंचे फुटपाथ ठेवणे, तसेच पुलावरून रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करणे, दोन्ही मार्गांवर बस स्टॉप उपलब्ध करणे या मागण्या सर्वच राजकीय पक्ष व स्थानिकांनी वेळोवेळी आपापल्या तऱहेने संबंधितांकडे केल्या होत्या. लोअर परळ रेल्वे स्थानकावरून बाहेर आल्यानंतर लालबाग, काळाचौकी व भायखळा तसेच वरळी आणि प्रभादेवीच्या दिशेने जाणाऱयांना टॅक्सी, बस कुठे मिळणार हा मोठा प्रश्न आहे. एखादा हायवेवरून जाणारा पूल जसा बांधला जातो तो विचार नजरेसमोर ठेवून हा पूल बांधला गेल्याने स्थानिक नागरिक व असंख्य प्रवाशांचे हाल होत आहेत. एखादा पूल बांधताना या पुलावर पूर्वी काय होते? प्रवासी व स्थानिकांची गरज काय आहे? याचा विचार होणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पुलाचे बांधकाम दीर्घकाळ चालले तो त्रास सहन केल्यानंतर व आश्वासन मिळूनही प्रवासी व स्थानिकांना आवश्यक सुविधा कधी मिळणार? असा प्रश्न लोकांना पडला आहे.