अभिनेता अन मार्गदर्शक

सध्या सोनी मराठीवर ‘राणी मी होणार’ ही मालिका लोकप्रिय होत आहे. या मालिकेत वरुण ही भूमिका करणारा अभिनेता म्हणजे आदित्य दुर्वे… एक प्रॉमिसिंग चेहरा.

आदित्यचे शिक्षण पुण्याच्या सिंहगड इन्स्टिटय़ूटमधून झाले असून त्याने इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो म्हणतो, लहानपणापासून मला सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची खूप आवड होती. कॉलेजमध्ये असताना अनेक ठिकाणी आम्ही पथनाटय़े सादर केली आहेत. त्याचदरम्यान विविध मालिकांसाठी ऑडिशन देणे हेसुद्धा सुरू होते. मी अनेक हिंदी मालिकांमध्ये ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.

आदित्यने ‘लाईफ ओके’ या वाहिनीवर ‘कॉमेडी क्लासेस’, तसेच ‘ये है मोहब्बते’, ‘कुमकुम भाग्य’ अशा काही मालिकांमध्ये काम केले होते. इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मराठी मालिकांमध्ये काम करण्यासाठी त्याने ऑडिशन दिली. कलर्स मराठीवर ‘सोन्याची पावलं’ मालिकेत आदित्यने प्रमुख भूमिका केली. त्यानंतर झी मराठीवरील ‘सत्यवान सावित्री’ या मालिकेत त्याने सत्यवानाची भूमिका केली. सध्या सुरू असलेल्या ‘राणी मी होणार’ मालिकेविषयी तो सांगतो, यात मी ‘वरुण’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. वरुणचे मीरावर खूप प्रेम आहे. तो खूप श्रीमंत आहे आणि आपल्याला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार आहे. ही व्यक्तिरेखा नंतर थोडेसे नकारात्मक वळण घेणारी असल्यामुळे सुरुवातीला मी ही भूमिका करण्याबद्दल साशंक होतो, पण मग मी विचार केला की, दोन मालिकेत लागोपाठ प्रमुख नायक केल्यानंतर ही नकारात्मक भूमिका स्वीकारणे हे आव्हान आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना मला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आदित्यने पुण्यामध्ये स्वतःचा स्टुडिओदेखील सुरू केला आहे. याविषयी तो म्हणतो, मी आयुष्यात खूप स्ट्रगल केला आहे. अनेक जण मॉडेलिंग करण्यासाठी, अभिनेता होण्यासाठी या क्षेत्रात स्ट्रगल करत असतात. ऑडिशन नेमकी कोणत्या पद्धतीने द्यावी तसेच पोर्टपहलिओ कसा असावा या गोष्टीचे मार्गदर्शन करण्यासाठी मी पुण्यामध्ये स्टुडिओ सुरू केला आहे. यात मी आणि माझी टीम या क्षेत्रात येण्यासाठी नवोदितांना मार्गदर्शन करत असते.

खरोखरच आदित्य अभिनेता आणि मार्गदर्शक या दोन्ही जबाबदाऱया उत्तमपणे सांभाळत आहे.