जनन-मरणाचा अपूर्व सोहळा

>> मुकुंद कुळे

दि. बा. यांची कथा अशी सारांश रूपाने सांगण्याचं कारण म्हणजे नुकताच पाहिलेलादास्तानरामजीचा प्रयोग! अक्षय शिंपी यानेआतां आमोद सुनांसि आले…’ या दि. बा. यांच्या कथेवर बांधलेली ही दास्तान. ही दास्तान अक्षय आणि नेहा कुलकर्णी दोघे मिळून सादर करतात. ती ऐकतानापाहताना रामजी आणि संपूर्ण कथाभर त्याचा अज्ञेयाशी चाललेला झगडाच समोर साक्षात् साकार होतो. केवळ कथनातून एवढी प्रत्ययकारी गोष्ट सांगणं खरोखरच कठीण असतं. मात्र अक्षय आणि नेहा दोघांनीही ती लीलया सांगितलीय एवढं खरं!

डथडा पावसाचे थेंब पडत आहेत नि शिवा नेमाणेची गाय अगदी व्यायला झाली आहे. पावसाचं पाणी पिऊन नदी मस्तीला येऊन वाहत आहे नि रामजी लोहाराच्या एकुलत्या एका मुलाला तिनं आपल्या खळबळत्या धारांत वाहून नेलं आहे. हवा ओल्या फडक्यासारखी सर्द झाली आहे नि गण्या शिनारेचा दमा वाढला आहे. निसर्गाचं थैमान सुरू झालं की, अशाच गोष्टी का घडतात? माणसं अशी निपचित का पडतात?

दि. बा. मोकाशी यांच्या ‘आतां आमोद सुनांसि आले…’ या कथेची सुरुवातच इतकी प्रत्ययकारी नि चित्रदर्शी आहे की, घडलेल्या आणि घडू पाहणाऱया शुभाशुभ घटितांचा विळखाच आपल्याभोवती पडतो. जे घडू नये असं वाटत असतं, ते जणू घडणारच अशी भयशंका मनात उमटत राहते. कितीही पाठीची कमान करून मान गुडघ्यात खुपसून झोपून राहिलं तरी जे घडायचं ते घडतंच… विशेषत ‘निसर्गाचं थैमान सुरू झालं की, अशाच गोष्टी का घडतात?’ या वाक्यातून दि. बा. जणू एक सार्वकालिक सत्य प्रस्तृत करतात आणि मग संपूर्ण कथाभर हे सत्य आपल्या मानगुटीवर बसून राहतं…

निसर्गाचं हे जीवघेणं थैमान आणि त्या थैमानकाळात मानवी जीवनात घडून येणाऱया जीवघेण्या घटना… यांचं एकमेकांशी असलेलं अंतसूत्रच दि. बा. आपल्या कथेत उलगडून दाखवतात. मात्र निसर्गाचं थैमान काय किंवा आपल्या आयुष्यात घडणाऱया अप्रिय घटना काय, त्यांचा प्रभाव अल्पकाळाचाच असतो, तो ओसरल्यावर मग पुन्हा सगळं लख्ख होतं, सगळं स्वच्छ दिसू लागतं. मग निसर्गच नाही, मानवी आयुष्यातील घटितांकडेही तटस्थपणे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी प्राप्त होते. म्हणून तर दि. बा. आपल्या कथेच्या शेवटी म्हणतात-

आतां आमोद सुनांसि जाले। श्रुतीसि श्रवण रिघाले।

आरिसे उठिले। लोचनेंसी।।

आपलेंनि समीरपणे। वेल्हावती विंजणे।

कीं माथेंचि चांफेपणें। बहकताती।।

म्हणजेच माणूस जेव्हा संकटात, दुःखात सापडतो तेव्हा तो गलितगात्र होतो, सर्वच ज्ञानेंद्रियं जणू काही मिटून घेतो. परिणामी त्याची सारासार विचार करण्याची शक्तीच तो गमावून बसतो. आपलंच दुःख कुरवाळत बसतो. मात्र कालांतराने पुन्हा असा एखादा क्षण त्याच्या आयुष्यात येतो की, त्यामुळे त्याचं आयुष्य पुन्हा उजळून निघतं. त्याने बंद करून घेतलेली मनाची कवाडं आपोआप खुली होतात आणि मग आपल्या पंचेंद्रियांवरचा सुटलेला ताबाही तो परत मिळवतो. तो आपल्याच आयुष्यात घडलेल्या घटितांकडे तटस्थपणे पाहू लागतो. जणू काही एवढा वेळ आयुष्य उपभोगण्याची गमावून बसलेली शक्तीच तो परत मिळवतो. म्हणजेच त्याच्या नाकाला पुन्हा एकदा गंध घेण्याची क्षमता प्राप्त होते, पुन्हा एकदा वेगवेगळे नाद त्याच्या कानावर पडू लागतात आणि पुन्हा एकदा डोळय़ांच्या आरशात समोरची प्रतिबिंबं लख्ख उमटायला सुरुवात होते.

हा सारा सगळय़ा संवेदना हरपणं आणि त्या पुन्हा प्राप्त होण्यापर्यंतचा प्रवास दि.बा. यांनी घडवला आहे तो मरण आणि सर्जन या मानवी जीवनातील दोन अटळ घटनांतून. निसर्गात जेव्हा कुणाचा तरी कुठे तरी मृत्यू होत असतो, तेव्हाच दुसरीकडे कुठे तरी कुणी तरी जन्माला येत असतं. मग तो जाणारा वा येणारा जीव मनुष्याचा असो वा प्राण्याचा. निसर्गासाठी सगळं सारखंच… आणि हेच सत्य मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्याने समजून-उमजून घ्यायला हवं. मात्र मनुष्य जन्माचा जेवढा सोहळा करतो, तेवढाच मरणाचा शोक आणि तरीही कोणत्याही दुःखाचा विसर पाडण्याची ताकद कोणत्याही सर्जनातच असते. हेच दि. बा. यांनी आपल्या कथेत अधोरेखित केलंय.

दि. बा. हे सारं आपल्यासमोर मांडतात ते रामजी या कथेच्या नायकाच्या माध्यमातून. तुफान पडणाऱया पावसामुळे नदीला बेफाम पूर आलेला आहे आणि कळत-नकळत कसा ते माहीत नाही, पण रामजीचा मुलगा या नदीने ओढून नेला आहे. रामजीचा हातातोंडाशी आलेल्या मुलाचं मात्र नदीने त्याचं शेवटचं दर्शनही रामजीला घडू दिलेलं नाही. परिणामी रामजी सुन्न, बधिर झालेला आहे. त्याला स्थळ, काळाचं भान राहिलेलं नाही. खाण्या-पिण्यापासून सगळय़ाच इंद्रियगम्य क्षमता तो हरवून बसला आहे.

कुणाचाही मृत्यू ही दारुणच घटना असते. मात्र त्यामुळे जीवनक्रम थांबत नाही. तो सुरूच ठेवावा लागतो. अनेकदा काळ हाच त्यावरचा उत्तम उपाय असतो आणि त्यासाठी तेवढा वेळही द्यावा लागतो. पण जेव्हा दुःखी व्यक्ती स्वतहून त्यातून सावरत नाही तेव्हा बाहेरच्या कुणी तरी पुढाकार घ्यावा लागतो. रामजीच्या दुःखाचा कोंब तर ताजाच होता. मात्र तो ज्या पद्धतीने स्तंभित झाला होता त्यासाठी त्याच्या मदतीला त्याचे तीन मित्र धावून येतात. संतू वाणी, जोशी शिंपी आणि गोविंदा भाजीवाला. हे तिघे आणि रामजी घडशी, चौघेही माळकरी. साहजिकच त्यांचा वारीला जाण्याचा आणि पोथी लावण्याचा वर्षानुवर्षाचा क्रम. रामजीच्या दुःखावर याचाच उतारा लागू पडेल हे जाणून ठरल्याप्रमाणे तिघेही पोथीचा दिवस उजाडल्यावर रामजीला घेऊन येतात. ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाची पोथी लावली जाते. मात्र संतू वाणी जे काही वाचत असतो ते सारंच रामजीच्या डोक्यावरून जात असतं. या साऱयाचा आपल्या जगण्याशी, दुःखाशी काहीच संबंध नाही असंच त्याला वाटत असतं. खरं तर त्याने याआधी अनेकांचं दुःख पोथ्यांमधले हेच दाखले देऊन शमवलेलं असतं. मात्र परदुःख कायमच शीतल असतं. जेव्हा आपल्यावर प्रसंग ओढवतो तेव्हाच दुःखाची जातकुळी आपल्याला उमगते. तद्वतच आता रामजीच्या बाबतीत घडलेलं आहे. आपल्यावरच बाका प्रसंग ओढवताच आपणच लोकांना दिलेले सल्ले तो विसरलेला आहे. किंबहुना आता त्याच्या अहंकाराने फणा उभारलेला आहे. आता थेट देवाशीच त्याने उभा दावा मांडला आहे. मी 30 वर्षं तुझी नितनेमाने वारी केली, त्याचं पुण्य गेलं कुठे? असा सवालच तो देवाला टाकतो. माणसाला आपल्या सुखाचं श्रेय आणि दुःखाचं अपश्रेय द्यायला नेहमीच कुणाची तरी गरज भासते. रामजीसारख्या देवभोळय़ा माणसांसाठी तर ‘तो कुणी तरी’ कायम ईश्वरच असतो. म्हणूनच आता ओढवलेल्या परिस्थितीसाठीही रामजी देवालाच जबाबदार धरतो आणि आपलं दुःख कुरवाळत बसतो.

… आणि नेमका याच वेळी त्याच्या कानावर शिवा नेमाणेच्या बायकोचा धावा पडतो, “रामजीदा रामजीदा… धाव रं बाप्पा, माजी गाय अडली रं बाप्पा…’’ नि आतापर्यंत ज्ञानदेवांच्या अमृतानुभावातील ओव्यांनीही न हललेला रामजी आतून हलतो… जणू काही आपल्या मुलानेच मारलेल्या या हाका आहेत असं समजून रामजी ताडकन् उठतो नि नेमाणेच्या बायकोच्या मागोमाग धावत सुटतो.

अशी अडलेली गाय सोडवणं म्हणजे रामजीचा हातखंडा. पण आता रामजीसाठी ती केवळ अडलेली गाय नसते. गायीच्या पोटात अडकलेलं वासरू, त्याच्यासाठी नदीच्या भोवऱयात अडकलेलं त्याचं स्वतचं लेकरू होऊन जातं आणि मग रामजी आपलं सगळं कौशल्य पणाला लावतो. गायीच्या भरल्या पोटावरून एक हात फिरवत दुसरा हात तो गायीचा मायांगात घालतो आणि फुटलेल्या पाणथैलीतून बाहेर आलेला जीव हुडकायला लागतो. वासरू पुढच्या दोन खुरांतून बाहेर येणं गरजेचं असतं… म्हणजे आधी पुढचे दोन पाय, मग डोकं आणि मग मागचे दोन पाय असं वासरू बाहेर आलं की ते बरोबर जमिनीवर लडबडत उभं राहतं. पण गायीच्या पोटातलं वासरू या स्थितीत नसतं. म्हणूनच ती अडलेली असते. पण रामजी तिच्याशी बोलतो, तिला आईपणाचं-बाईपणाचं दुःख सांगत तिला सर्जनाच्या वेणाही समजावून सांगतो आणि हे सारं समजावत असताना त्याचा एक हात तिच्या गर्भाशयात अलगद फिरत असतो. जणू काही त्याचा अज्ञेयाशी झगडा चालू असतो आणि एका क्षणी त्याच्या बोटांना डोळे फुटतात ते वासराचा बरोबर अंदाज घेऊन त्याला फिरवतात. पुढच्या क्षणी त्याचे पुढचे खूर रामजीच्या हाताला लागतात नि ते धरून ओढल्याबरोबर एवढा वेळ या दुनियेत येण्यासाठी आतुर झालेलं ते वासरू पटकन् बाहेर उडी मारतं आणि टुणकन् आपल्या चार पायांवर उभं राहातं आपल्या आईकडे झेपावतं. एवढा वेळ रामजीची अज्ञेयाशी चाललेली झटापट आता संपलेली असते. आतापर्यंत जे अज्ञेय होतं, ते आता त्याच्यासाठी ज्ञेय झालेलं आहे. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या मनात ‘असं माझ्या बाबतीत का घडावं’ असा जो झगडा सुरू झालेला होता जणू काही त्याचं उत्तरच वासराच्या जन्माने मिळतं. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा जगाचा नियमच आहे. जेव्हा कुणी तरी कुठे तरी जन्मत असतं तेव्हाच कुणी तरी कुठे तरी मरणही पावत असतं. मात्र आपण हे मरण सहजासहजी घेत नाही. जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने गळाठून जातो. स्वतच्या सगळय़ा संवेदनाच गोठवून टाकतो. पण अखेर घडतंच काही ना काही शुभंकर सर्जनशीलतेच्या रूपात आणि मग पुन्हा ज्ञानेंद्रियं कामाला लागतात, साऱया संवेदना जाग्या होतात अन् मग माणूस रामजीसारखा आपल्याला आलेल्या कटू अनुभवाकडे स्थिर आणि तटस्थपणे पाहू लागतो.

रामजीच्या मुलाचा झालेला मृत्यू आणि रामजीने अडलेल्या गायीची सुटका करून या जगात आणलेलं तिचं वासरू या अवकाशात दि. बा. मरण-सर्जनाच्या चिरंतन चाललेल्या प्रक्रियेचा जो काही उलगडा करतात, तो खरोखरच वाचकांना अनुभवसमृद्ध करणारा आहे.

[email protected]