इंडस्ट्रीची मी शेवटची मुघल! 90 व्या वाढदिवशी आशा भोसले यांचा दुबईत कार्यक्रम

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले येत्या 8 सप्टेंबर रोजी वयाची 90 वर्षे पूर्ण करणार आहेत. फिल्म इंडस्ट्रीत आठ दशकांची प्रदीर्घ कारकीर्द असणाऱया आशा भोसले यांनी ‘मी फिल्म इंडस्ट्रीची शेवटची मुघल आहे,’ असे वक्तव्य आज केले.

 आशा भोसले आपल्या 90 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन दुबईत करणार आहेत. त्यानिमित्ताने दुबईत एका संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये आशा भोसले स्वतः गाणार आहेत. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी अभिनेते जॅकी श्रॉफ, पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे आदी उपस्थित होते. यावेळी आशा भोसले म्हणाल्या, मी वयाच्या दहाव्या वर्षापासून इंडस्ट्रीत आहे. मी बॉलीवूडमधील एकमेव अशी व्यक्ती आहे की जिला बॉलीवूडचा सर्व इतिहास माहिती आहे. मी जर त्याविषयी सांगायला लागले तर तीन ते चार दिवस अपूर्ण पडतील. मी काहीही विसरलेली नाही. या इंडस्ट्रीमधील मी शेवटची मुघल आहे.

  दुबईतील कार्यक्रमाबद्दल आशा भोसले म्हणाल्या, ‘मी 90 वर्षांची झाली असे लोकांना वाटते. मला असं वाटतं की आताच तर हे घडलं होतं. मला वाटतच नाही की मी मोठी झालीये. मला हे पण नाही वाटत की मी वेगळं काही केलंय. तो वर बसलाय तो सगळं काही करून घेतोय. मी फक्त करतेय. पण यांनी जेव्हा मला सांगितलं की त्यांना कार्यक्रम करायचाय, तोदेखील खूप मोठा, जसा माझ्या मनात आहे तसा. तर मी म्हणाले, एवढे कलाकार कोण घेऊन जाणार? असे नाही की मुंबईत आहे, पुण्यात आहे. थेट दुबईत. कसे होणार हे? पण सगळं जमून येतंय. दुबईतील कार्यक्रमाची तयारी सुरू झालेय. आम्ही रिहर्सल करतोय. ’

पीएमई एंटरटेन्मटेंट कंपनीने दुबईत आशा भोसले यांचा कार्यक्रम आयोजित केला आहेगाणी, गप्पा, किस्से असे या तीन तासांच्या कार्यक्रमाचे स्वरूप आहेआशा भोसले या कार्यक्रमात गाणार आहेत. अनेक हिंदी गीतांसोबत आशाताईंच्या आवाजातील एक मराठी नाटय़गीत दुबईतील रसिकांना ऐकायला मिळेल