टक्केटोणपे – सभागृहात आली चिमणी आणि माळढोक

विधानसभेत आज विमानतळाच्या प्रश्नावर झालेल्या तासभराच्या चर्चेच्या निमित्ताने चिमणी आणि माळढोक पक्ष्यांवर रंगतदार चर्चा झाली, पण चिमणी होती ती सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची. सोलापूरच्या नियोजित, पण रखडलेल्या बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रश्नाकडे काँग्रेसच्या प्रणीती शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, या विमानतळाच्या योजनेआड सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी येत होती. त्यामुळे साखर कारखान्याची चिमणी तातडीने तोडली, पण तरीही विमानतळाचे काम सुरू झाले नाही. दुसरीकडे या भागातील 33 हेक्टर जागेवर माळढोक पक्ष्यांचा अधिवास असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे परवानगी मिळत नाही, पण याच भागात सुरत-चेन्नई महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. या ठिकाणी माळढोक पक्ष्याचा प्रश्न येत नाही का, असा सवाल प्रणीती शिंदे यांनी केला. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, या भागात एकच माळढोक पक्षी आहे. तोसुद्धा आहे की नाही माहिती नाही. कारण त्या एका माळढोक पक्ष्याला कोणी पाहिलेले नाही, पण एका माळढोकमुळे विमानतळाला परवानगी मिळालेली नाही, अशी टिप्पणी करताच सभागृहात हास्याची लकेर उमटली.