नगरमध्ये उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सवांना शासनाकडून पुरस्कार

गणेशोत्सव काळामध्ये उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सवांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी नगरमध्ये 6 जणांची कमिटी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली तयार करण्यात येईल. या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.

याबाबत जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, पर्यावरणपूरक मूर्ती तसेच पाणी वाचवा मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा तसेच गणेश मंडळांनी केलेले धार्मिक कार्य अथवा वर्षभर केलेले रक्तदान शिबीर अथवा पर्यावरण रक्षक आदि विषय तसेच पारंपरिक खेळांच्या स्पर्धा यासह विविध प्रकारच्या विषयांना एकूण 150 गुण देण्यात आले आहेत. धर्मदाय आयुक्त तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागाकडे ज्या मंडळांची नोंद झालेली आहे. अशांना या स्पर्धेमध्ये भाग घेता येणार असल्याचेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली असून यामध्ये सदस्य म्हणून प्रगत कला महाविद्यालयाचे महावीर सोनटक्के, उपप्रादेशिक अधिकारी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी असे या समितीचे सदस्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गणेशोत्सव काळामध्ये शासनाने घातलेल्या नियम व अटी लावून दिलेले आहेत त्याचे तंतोतंत सर्वांनी पालन करावे असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्यातून एक नाव निश्चित केले जाणार आहे. हे नाव राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. नगरच्या सार्वजनिक गणेश मंडळाने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी राहुल पाटील ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.