‘बीसीसीआय’ला वेगवान गोलंदाजांची चिंता; टी-20 वर्ल्ड कपसाठी नव्यांना संधीची शक्यता

 

टी-20 वर्ल्ड कपची डेडलाईन जवळ आली असूनही हिंदुस्थानी संघात कोणत्या वेगवान गोलंदाजाला संधी द्यावी, याबाबत बीसीसीआयपुढे अंधार पसरला आहे. एकटा जसप्रीत बुमरा सोडला तर हिंदुस्थानच्या आघाडीच्या वेगवान गोलंदाजांच्या अपयशाने बीसीसीआयची चिंता वाढवली आहे. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयची संघनिवड समिती सध्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे, मात्र आयपीएलमध्ये 40हून अधिक लढती होऊनही वेगवान गोलंदाज संघर्ष करताना दिसताय. त्यामुळे संघ निवडीसाठी बीसीसीआयची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे.

 

टी-20 वर्ल्ड कपच्या संघ निवडीसाठी येत्या दोन ते तीन दिवसांत निवड समिती सदस्यांची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. निवड समितीसमोर फलंदाजीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. फिरकीपटूदेखील चांगली कामगिरी करत असल्याने त्यांचेदेखील पर्याय निवड समितीसमोर आहेत, मात्र निवडसमितीची डोकेदुखी वेगवान गोलंदाजांनी वाढवली आहे. जसप्रीत बुमराचा अपवाद सोडला तर इतर वेगवान गोलंदाजांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत सुमार कामगिरी केली आहे. बुमराने आठ सामन्यांमध्ये 6.37 च्या इकॉनॉमी रेटने 13 विकेट टिपले आहेत. त्यामुळे या प्रमुख वेगवान गोलंदाजाचे टी-20 वर्ल्ड कप संघातील स्थान पक्के वाटते.  टी-20 वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद सिराज बुमराला नव्या चेंडूने सपोर्ट करेल, असे आयपीएलपूर्वी मानले जात होते, मात्र त्याचा इकॉनॉमी रेट 9.41 आहे. यावरून तो किती महागडा ठरतोय हे दिसून येते. एकदिवसीय विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला असून टी-20 विश्वचषकासाठी तो पुनरागमन करणे कठीण आहे.

 

नव्या गोलंदाजांना संधी मिळणार का?

वेगवान गोलंदाज टी. नटराजन हैदराबादसाठी तिखट मारा करतोय. त्याने पाच सामन्यांमध्ये 8.50 च्या इकॉनॉमीने 10 विकेट टिपले आहेत. त्याचे यॉर्करही भन्नाट होते. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट टिपणारा राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माही चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने तीन सामन्यांत 6 फलंदाज बाद केलेत. मोहसीन खान, तुषार देशपांडे, यश ठाकूर, मयंक यादव आणि हर्षित राणा यांसारख्या नव्या दमाच्या गोलंदाजांपैकी कोणाचा संघ निवड समिती विचार करतेय का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. टी-20 वर्ल्ड कपसाठी सर्वोत्कृष्ट 15 खेळाडूंची निवड येत्या काही दिवसांत होणार आहे.