अजित पवारांना 4 जूननंतर मिशा काढून फिरावे लागेल; श्रीनिवास पवार यांचा पलटवार

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदान होणार आहे. त्याचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. त्यातच आता बारामती मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या मतदारसंघात चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढत होत आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. त्यातच आता अजित पवार यांच्यावर त्यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी पलटवार केला आहे. देशात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, त्यानंतर अजित पवार यांना मिशा काढून फिरावे लागेल, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.

सध्या सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असे अजित पवार यांनी शनिवारी बारामती येथील सभेत म्हटले होते. त्यावर श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. अजित पवार यांना 4 जूनला निकाल लागल्यानंतर मिशा काढून फिरावे लागेल, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.

पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई नाराज झाल्याचेही त्यांनी सांगितले. माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तितकेच प्रिय आहेत. मला तुमच्या दोघांच्या लढाईत पडायचे नाही, असे अजितदादांच्या आईने सांगितले. या संघर्षामुळे अजित पवार यांची आई बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहायला गेली आहे. अजितदादांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळेच आपण त्यांची साथ सोडली, असेही श्रीनिवास पवार यांनी सांगितले.