‘BMC’ चं ‘BJPMC’ करण्याचा भाजपचा प्रयत्न, क्लाईड क्रास्टो यांची टीका

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांचे कार्यालय थाटले आहे. महानगरपालिकेतील दालन हडपल्याने भाजपविरोधात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून आक्रमक होत विरोधकांनी विधानसभेत आवाज उठवला. पालकमंत्र्यांनी पालिकेतील दालनावर कब्जा केला आणि तिथे भाजपच्या माजी नगरसेवकांनाही उठबस करण्याची मुभा दिली. हे अत्यंत चुकीचे असून मग सर्वच माजी नगरसेवकांची महापालिकेतील कार्यालये उघडी करा, अशी मागणी विरोधकांनी यावेळी केली.

दरम्यान या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप ‘बीएमसी’ला ‘बीजेपीएमसी’मध्ये बदलण्याचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल क्रास्टो यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, ‘पहिल्यांदा पालकमंत्री लोढा यांचे कार्यालय मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात उघडले, त्यानंतर भाजपच्या माजी नगरसेवकांनी तेथे बसण्यास सुरुवात केली. आता त्यांना लोढा आणि मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यात मध्यस्थीसाठी एक वरिष्ठ अधिकारी देण्यात आला आहे.’