शोरमामुळे तरुणाचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग; फेरीवाल्यांवर कारवाई

मानखुर्दमध्ये फेरीवाल्याकडील चिकन शोरमा खाल्ल्यानंतर एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आता पालिकेला जाग आली असून महाराष्ट्र नगर येथील फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र एका मुलाचा मृत्यू झाला असताना केवळ 15 फेरीवाल्यांवर कारवाई केल्यामुळे पालिकेच्या दिखाऊपणाबद्दल साशंकता व्यक्त होतेय.

महाराष्ट्र नगरमधील घटनेत प्रथमेश भोकसे या 19 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. ‘एम’ पूर्व विभागातील मानखुर्दमध्ये महाराष्ट्र नगर येथे अनधिकृत फेरीवाल्यांचे चांगलेच पेव फुटले आहे, या फेरीवाल्यांवर आता पालिकेकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ही कारवाई नियमितपणे केली जात असल्याचा दावा एम पूर्व विभागाकडून करण्यात आला आहे. यामध्ये मंगळवारी सायंकाळी एम पूर्व विभागाच्या अतिक्रमण विभागामार्फत एकूण 15 फेरीवाल्यांवर कार्यवाही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कार्यवाहीअंतर्गत भाजीपाला, फेरीवाल्यांचे बाकडे आणि स्टॅण्ड असे साहित्य जप्त केले.

पालिका म्हणते, महाराष्ट्र नगर फेरीवालामुक्त

एम पूर्व विभागाने महाराष्ट्र नगर परिसर कारवाईमुळे फेरीवालामुक्त झाल्याचा दावा केला आहे. याआधीही एम पूर्व विभागाच्या माध्यमातून या परिसरात सातत्याने कार्यवाही करण्यात आली होती. काही नागरिकांनी या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.