सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, दोघांना अटक

दबंग अभिनेता सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसमध्ये चाहते असल्याचे सांगत दोन जणांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. कहर म्हणजे दोघांकडे बनावट आधार कार्ड असल्याचे आढळून आले आहे. पनवेल ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली.

सोमवारी सकाळी सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसमध्ये दोनजण घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले मात्र तरीही ते आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. ज्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी  आरोपींना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. तपासा दरम्यान दोन्ही तरुणांकडे बनावट आधारकार्डही मिळाले आहेत.दोघेही स्वत:ला सलमान खानचे चाहते असल्याचे सांगत आहेत.

याप्रकरणी पोलीस सध्या हे दोन तरुण कोण आहेत, त्यांचा नेमका हेतू काय होता, ते कुठून आले याचा तपास करत आहेत. याबाबत पोलिसांचे म्हणणे अद्याप समोर आलेले नाही. सलमान खानच्या गेल्या वर्षी अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. गँगस्टार लॉरेन्स बिश्नोई यानेही त्याला धमकीचा ईमेल केला होता.त्यामुळे सलमान खानला व्हाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. व्हाय प्लस सिक्युरिटीमध्ये सलमान खान नेहमी 1 किंवा 2 कमांडो आणि 2 पीएसओ सोबत असतो.

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला याच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने गेल्या वर्षी सलमान खानला अनेकदा धमक्या दिल्या होत्या. त्याने शिक्षेला सामोरे जाण्यास तयार राहावे, असे त्याने उघड धमकी दिली होती. जून 2023 मध्ये सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र आले होते आणि नंतर एक ई-मेल देखील आला होता.