शेअर बाजाराने गाठला विक्रमी टप्पा! बीएसईची मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलरच्या पार

जागतिक शेअर बाजारात चढउतार होत आहेत. तसेच जागतिक अर्थव्यवस्थाही दबावाखाली आहे. अशा परिस्थितीतही देशातील शेअर बाजाराने आपली घोडदौड कायम ठेवली आहे. आता शेअर बाजाराकडून आनंदाची बातमी येत आहे. शेअर बाजाराने मंगळवारी विक्रमी टप्पा गाठला आहे. मुंबई शेअर बाजार म्हणजेच बीएसईचा मार्केट कॅप ऑल टाईम हायवर पोहचला आहे. या जबरदस्त तेजीमुळे बीएसईचा मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 3,33,26,881.49 कोटी रुपयांवर गेला आहे. आतापर्यंतचा देशातील हा विक्रम आहे. ही आकडेवारी देशाच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. मंगळवारी उद्योगपती गौतम अडानी यांच्या अडानी समुहातील शेअरमध्ये आलेल्या जबरदस्त तेजीमुळे बाजारालाही नवी गती मिळाली आहे. या विक्रमामुळे देशातील शेअर बाजार जगातील पाचवे सर्वात मौल्यवान शेअर मार्केच ठरले आहे.

बाजाराने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार करत जगातील पाचव्या मौल्यवान बाजाराचे स्थान पटकावले आहे. आता हिंदुस्थानी बाजाराआधी अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँग बाजाराचा क्रमांक आहे. देशातील शेअर बाजाराने घोडदौड कायम ठेवत ही विक्रमी वाटचाल केली आहे. शेअर बाजाराच्या घोडदौडीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळाली आहे. त्यामुळे जगातील अनेक गुतंवणूकदार भारतीय शेअर बाजाराकडे वळत आहेत. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि बाजारावर विश्वास दाखवला आहे. याआधी दोन वर्षापूर्वी कोरोना काळात भारतीय शेअर बाजाराने 3 ट्रिलियम डॉलरचा टप्पा गाठला होता. त्यानंतर आता 4 ट्रिलियनचा टप्पा गाठला आहे.

जगातील अव्वल शेअर बाजार

देश                        मार्केट वैल्यू

  • अमेरिका             48 ट्रिलियन डॉलर
  • चीन                  10.7 ट्रिलियन डॉलर
  • जापान               5.5 ट्रिलियन डॉलर
  • हॉन्ग कॉन्ग          4.7 ट्रिलियन डॉलर
  • हिंदुस्थान             4.1 ट्रिलियन डॉलर