पावसाळी अधिवेशनात कॅसिनो विधेयकाचाही समावेश करणार, राज्यात कॅसिनोला परवानगी? 24 विधेयके आणि 6 अध्यादेश मांडणार

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. उद्या 17 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार असून अधिवेशनात 24 विधेयके व 6 अध्यादेश मांडले जाणार आहेत. या विधेयकात महाराष्ट्र कॅसिनो विधेयकाचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात कॅसिनो सुरू करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे मानले जात आहे.

या विधेयकांत महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक राज्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. त्याचप्रमाणे राज्यातील एसआरए प्रकल्पांसंदर्भातील महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा विधेयक, महानगरपालिका विधेयक, मुंबई महानगरपालिका विधेयक, विद्यापीठासंदर्भातील विधेयके, महाराष्ट्र माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार विधेयक, महाराष्ट्र कॅसिनो विधेयक या महत्त्वाच्या विधेयकांचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे अध्यादेशांमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत व जिल्हा परिषद अध्यादेश, महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक अध्यादेश, महाराष्ट्र सहकारी संस्था अध्यादेश यांसारखे महत्त्वाचे अध्यादेश मांडले जाणार आहेत.

दरम्यान या संदर्भात मनसेने फेब्रवारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून राज्यात कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली होती. राज्याच्या विधिमंडळात महाराष्ट्र कॅसिनोज(नियंत्रण व कर) अधिनियम हा कायदा 1976 पासून आहे. पण त्याची अधिसूचना काढलेली नाही. या कायद्यात कॅसिनोसाठीचा परवाना  प्रक्रीया, आकारले जाणारे शुल्क, तसेच परवाना रद्द करण्याच्या नियमांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 1887 पासून लागू असलेला मुंबई जुगार प्रतिबंधक अनिनियम कॅसिनोला  लागू होणार नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे.  10 मे 2022 रोजी पर्यटन संचलनालयाच्या प्रधान सचिवांनी अभ्यासगट स्थापन करून गोवा, सिक्किम, मकाऊ आणि नेपाळमध्ये जाऊन कॅसिनोची पाहाणी केली होती असा दावा मनसेने मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात केला होता.