एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करताय… सावधान फुकट्यांवरील कारवाईसाठी मध्य रेल्वेने जारी केली हेल्पलाइन

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे अनेकजण एसी लोकलमधून प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या जशी वाढतेय तशीच विनातिकीट प्रवास करणाऱ्या घुसखोरांची आकडेवारीदेखील वाढतेय. त्यामुळे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी मध्ये रेल्वेच्या टास्क पर्ह्सने महत्त्वाचा निर्णय घेत हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर मेसेज करून विनातिकीट प्रवास करणाऱया प्रवाशांची तक्रार करता येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर दररोज 66 एसी लोकल फेऱया चालवल्या जातात. यातून जवळपास 78 हजार 323 प्रवासी दररोज प्रवास करतात. वाढत्या उन्हामुळे एसी ट्रेनच्या प्रवाशांमध्ये वाढ झाली आहे, मात्र या एसीमधून अनेकजण विनातिकीट प्रवास करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अशा फुकटय़ा प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने आता मोठे पाऊल उचलले आहे.

अशी होणार कारवाई

मध्य रेल्वेने एका स्पेशल मॉनेटरिंग टीमची स्थापना केली आहे. 7208819987 या क्रमांकावर केवळ मेसेज करुन विनातिकीट फिरणाऱया प्रवाशाची तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यानंतर स्पेशल मॉनेटरिंग टीम साध्या वेशात येऊन कारवाई करेल. त्वरित तक्रारीचे निराकरण न झाल्यास दुसऱया दिवशी टीम येऊन कारवाई करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.