तोच चंद्रमा नभात…! चांद्रयान-3 उद्याच्या लँडिंगसाठी तयार, अवघ्या 70 किमी अंतरावरून टिपलेले फोटो जारी

चांद्रयान-3 मोहिमेच्या लँडिंगची वेळ अवघ्या काही तासांवर वर ठेपली असून सगळ्यांची उत्सुकता वाढली आहे. बुधवारी, 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंगसाठी सर्व प्रयत्न सुरू असल्याची माहिती हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने सांगितले.

इस्रोनं सांगितलं की सर्व यंत्रणा नियमित तपासण्या करत आहेत आणि सर्वकाही अगदी सुरळीत सुरू आहे.

लँडिंग ऑपरेशन्सचे थेट प्रक्षेपण 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:20 वाजता सुरू होईल, असंही इस्रोनं त्याच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर म्हटलं आहे.

चांद्रयान-2 ऑर्बिटरशी अधिकृतपणे संपर्क स्थापित केल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या लँडिंगसाठी काउंटडाउन सुरू झालं आहे.

अंतराळ संस्थेनं 19 ऑगस्ट 2023 रोजी लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC) ने सुमारे 70 किमी उंचीवरून टिपलेल्या चंद्राचे फोटो देखील शेअर केले आहेत.

LPDC प्रतिमा लँडर मॉड्यूलला ऑनबोर्ड चंद्र संदर्भ नकाशाशी जुळवून त्याचे स्थान (अक्षांश आणि रेखांश) निर्धारित करण्यात मदत करतात, असं त्यात म्हटलं आहे.

याआधी स्पेस ऍप्लिकेशन सेंटर-इस्रोचे संचालक नीलेश एम देसाई यांनी सांगितलं की, चांद्रयान चंद्रावर उतरण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसल्यास सॉफ्ट लँडिंग 27 ऑगस्टपर्यंत ढकललं जाऊ शकतं. मात्र त्याचवेळी चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी वेळापत्रकानुसार उतरेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.