भुजबळांचे गुडघ्याला बाशिंग; उमेदवारीवरून महायुतीत तीन तिघाडा

मिंधे गटाचा खासदार असतानाच भाजपानेही नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे, असे असतानाच भुजबळ चुलते-पुतणेही उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाल्याने तीनतिघाडा अशी स्थिती महायुतीत निर्माण झाली आहे. भुजबळांनी तर स्वतःला कार्ययोद्धा संबोधणारा टीझर जारी करून भाजपा-मिंधे गटावर कडी केली आहे.

सलग दोनवेळा प्रतिनिधित्व केल्याने आपल्यालाच उमेदवारी मिळावी, असा आग्रह मिंधे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी धरला आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर शक्तिप्रदर्शनही केले. त्यांना शह देत भाजपाच्या जिह्यातील आमदार व पदाधिकाऱयांनी सोमवारी उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन भाजपालाच ही जागा घ्यावी, अशी मागणी केली. दोघांच्या भांडणात आपला लाभ व्हावा, यासाठी उमेदवारीकरिता खुद्द मंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ हे दोघेही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

कमळ हातात घेणार का?
साताऱयाच्या जागेच्या बदल्यात नाशिकची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला मिळेल अन् आयती उमेदवारी आपल्या पदरात पडेल, अशी आशा भुजबळ काका-पुतण्यांना आहे. भाजपाचा रोष कमी करण्यासाठी छगन भुजबळांनीच भाजपात येऊन कमळाच्या चिन्हावर लढावे, असा गळ त्यांना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी टाकला आहे. लोकसभेसाठी भुजबळ कमळ हाती घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.