योग, शाकाहार अन् सोमवारी उपवास!

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे त्यांचे निर्णय आणि वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मात्र आता ते चर्चेत आले आहेत ते त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल, त्यांच्या हेल्दी लाईफस्टाईलबद्दल. दररोज योग, शाकाहार अन् सोमवारी उपवास…अशी त्यांची आरोग्यदायी जीवनशैली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले की, ते आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी 7.30 वाजता करतात. सकाळी शांत वातावरण असते. अशा वातावरणात अनेक विषयांवर विचार करतात आणि योग करतात. ते गेल्या 25 वर्षांपासून योगा करत आहेत. सगळय़ात चांगला मित्र म्हणून आपल्या पत्नीकडे पाहतात. मी पत्नीसोबत आयुर्वेदिक डाएट घेतो. आम्ही दोघे शाकाहारी आहोत, असे चंद्रचूड म्हणाले.

25 वर्षांपासून उपवास

चंद्रचूड यांचा दर सोमवारी उपवास असतो. ते सांगतात, महाराष्ट्रात उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाल्ली जाते. मी राजगिरा खातो. गेल्या 25 वर्षांपासून मी सोमवारचा उपवास ठेवतोय. राजगिरा महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात खाल्ला जातो.

आयुष्य चढ-उतारांचे

आयुष्यात चढ-उतार येतात. माझे आयुष्य इतरांपेक्षा वेगळे नाहीये. मी पण आयुष्यात अनेक कठीण प्रसंग पाहिले आहेत. या समस्यांमधून पुन्हा उभारी घेण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. आपल्या आयुष्यातील प्रत्येत कठीण प्रसंगाचा एक उद्देश असतो. याची जाणीव आपल्याला पुढे होते.