कोकणावर डोमकावळ्यांची नजर पडलीय, सिडकोला कोकणात पाऊल ठेवायला द्यायचे नाही; विनायक राऊत यांचा निर्धार

डोमकावळ्यांची नजर कोकणावर पडली आहे. कोकण सिडकोच्या नियंत्रणाखाली आणून कोकणातील जमिनी, जांभा दगडाच्या खाणी, समुद्रकिनाऱ्यावरची गावे हडप करण्याचा डाव भाजप आणि मिंधे सरकारने आखला आहे. पावस आणि गोळप जिल्हा परिषद गटातील 26 गावे सिडकोच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. हजारो हेक्टर जमिनी सिडकोच्या ताब्यात जाणार आहेत. वेळीच सावध व्हा, सिडकोला कोकणात पाऊल ठेवायला द्यायचे नाही, असा निर्धार इंडिया आघाडीचे लोकसभेसाठीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. ते पावस येथील महाकाली सभागृहात आयोजित केलेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.

खासदार विनायक राऊत यांनी सिडकोच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या पावस आणि गोळप या जिल्हा परिषद गटातील गावांची यादी आणि जमीनीचे क्षेत्रफळ याची माहिती दिली. ते म्हणाले की, 4 मार्च 2024 रोजी मिंधे सरकारने एक परिपत्रक काढून कोकण सिडकोच्या नियंत्रणाखाली आणला. रत्नागिरी जिल्ह्यातील 752 गावे आणि सिंधुदुर्गातील 284 गावे सिडकोच्या नियंत्रणाखाली आणली आहेत. कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील गावे, जांभा दगडांच्या खाणी यावर आता डोमकावळ्यांची नजर गेली आहे. तुमच्या जांभा दगडांच्या खाणी हस्तगत करण्याचा डाव आखला गेला आहे. तुम्ही जो एक जांभा दगड 20 रुपयांना विकता त्या जांभा दगडाची सौदी अरेबियामध्ये किंमत साडेचारशे रुपये आहे. त्यामुळे जांभा दगड सोन्याचीच खाण आहे, हे ओळखून धनदांडग्यांची नजर या खाणींवर पडली आहे. त्यामुळे सिडकोला पुढे करुन या खाणी ताब्यात घेण्याचा डाव आहे. याविरोधात मी स्वतः आवाज उठवला आहे. त्यामुळे सिडकोला आता कोकणात पाऊल ठेवू द्यायचे नाही, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.

रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न या सरकारने केला. आमिषे दाखवली. पण आम्ही कोणी त्याला बळी पडलो नाही. आम्ही लढत राहीलो. रस्त्यावरची लढाई मी लढतोय तर न्यायालयातील लढाई अॅड. अश्विनी आगाशे लढत आहेत. कोकणातील पर्यावरण, आंबा, काजू ही उत्पादने नष्ट करण्याचा डाव आम्ही कधीच साध्य होऊ देणार नाही, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, संजय साळवी, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

नारायण राणेंना तेराव्या यादीपर्यंत रखडवलं
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सर्व मंत्र्यांची उमेदवारी यापुर्वीच जाहीर झाली. मात्र, केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना उमेदवारीसाठी तेराव्या यादीपर्यंत रखडवलं. त्यांना वाट पहायला लावली हे राणेंचे दुर्दैवच. कोकणात आपला उमेदवार पडणारच आहे ना, मग ढकला त्यांना, असा विचार करून भाजपने राणेंना उमेदवारी दिल्याची टीका विनायक राऊत यांनी केली.

अदानीसाठी सोन्याचा दर वाढवला
सोन्याचे दर भरमसाठ वाढवले. पाकिस्तानात आणि श्रीलंकेत सोने खूप स्वस्त आहे, हिंदूस्थानातच सोन्याचे दर वाढले का, 70 हजार रुपये तोळे सोने आता 75 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. ही दरवाढ कोणासाठी माहिती आहे का, अदानीच्या सोन्याच्या खाणी आहेत. अदानीचा फायदा व्हावा म्हणन सोन्याचे दर वाढवले आहेत असा आरोपही विनायक राऊत यांनी केला.