दहशतवाद्यांकडे सापडले कुलाब्याच्या छाबड हाऊसचे फोटो, सुरक्षेत वाढ

दहशतवादविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी यांना पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. या संशयित दहशतवाद्यांकडे मुंबईतील कुलाबा येथील छाबड हाऊसचे फोटो सापडल्याने खळबळ माजली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला या दहशतवाद्यांकडून कुलाबा येथील छाबड हाऊसचे गुगल फोटो सापडले आहेत. यामुळे यंत्रणा संतर्क झाल्या असून छाबड हाऊसच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. हे आरोपी अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

छाबड हाऊसमध्ये आधीपासूनच अतिशय उच्च सुरक्षा आहे. गुरुवारी याठिकाणी एक मॉक ड्रिल देखील घेण्यात आली, अशी माहिती कुलाबा पोलीसांनी दिली आहे. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी छाबड हाऊस दहशतवाद्यांच्या लक्ष्यांपैकी एक होता. या दोन आरोपींना हल्ल्याचा कट रचल्याबद्दल राजस्थानमधून अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कुलाबा येथील ज्यू कम्युनिटी सेंटरमध्ये देखील सुरक्षा वाढवली आहे. हे दोघेही आरोपी राजस्थाच्या रतलाम येथील असून ते आता महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. या दोन्ही आरोपींवर NIA कडून पाच लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते.