सर्व काही ठीक असल्याचा केंद्र सरकारचा दावा फोल, जम्मू-कश्मीरमध्ये घुसखोरी सुरूच! – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

देशाच्या उत्तर सीमेवर परिस्थिती संवेदनशील असून जम्मू-कश्मीरमधून घुसखोरीचे प्रयत्न थांबलेले नाहीत, ते सुरूच आहेत. त्यामुळे उत्तरेकडील सीमेवर मोठय़ा प्रमाणात लष्कराच्या जवानांची तैनाती करण्यात आली आहे, अशी महत्त्वाची माहिती हिंदुस्थानचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरुवारी दिली. यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये सर्व काही ठीक आहे, असे सांगणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा दावा पह्ल ठरला आहे.

2024 मध्ये लष्करात आधुनिकीकरण केले जाईल. आतापर्यंत आम्ही नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करीत होतो, परंतु भविष्यात याहीपेक्षा अधिक टेक्नॉलॉजीचा वापर करू. सैन्यात आर्टिलरी युनिट्स आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टममध्ये सुधारणा केली जात आहे. देशाच्या सीमेवरील आव्हानात्मक ठिकाणी सैनिकांना वस्तू पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करू, असे लष्करप्रमुख म्हणाले. लष्कर टेक्नॉलॉजीचा वापर करीत असल्याने 2027 पर्यंत एक लाख कर्मचारी कपात केले जातील, असेही ते या वेळी म्हणाले.

कुणीही आमच्यावर डोळे वटारू शकत नाही

हिंदुस्थानवर कुणीही डोळे वटारू शकत नाही. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर चीनचा हिंदुस्थानकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. ब्रिटन दौऱ्यात त्यांनी हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांशी संवाद साधला.