देशात कोरोनाची 743 नवे रुग्ण, सात रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 743 नवी प्रकरणं समोर आली आहेत तर सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 997 रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. शनिवारी सकाळी 8 पर्यंत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंट जेएन.1 मुळे सध्या चिंता वाढली आहे. केरळ, कर्नाटक, दिल्लीसह नऊ राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चोवीस तासात कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 3, कर्नाटकात 2, छत्तीसगडमध्ये 1 आणि तामिळनाडूत 1 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानातच हा नवीन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये आढळला.

दिल्लीत परिस्थिती नियंत्रणात आहे. दिल्लीत शनिवारी कोरोनाच्या 11 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सात रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दिल्लीत 51 सक्रिय रुग्ण आहेत आणि आतापर्यंत दि्ल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 14 हजार 467 वर पोहोचली आहे.