कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात भीती,सिंगापूरमध्ये 56 हजार लोकांना लागण

कोरोनाचा नवा व्हेरियंट आला असून यामुळे हिंदुस्थानसह जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सिंगापूरमध्ये अवघ्या दोन आठवडय़ांत 56 हजार लोकांना या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे. त्यामुळे तेथील सरकारने नागरिकांना पुन्हा एकदा मास्क लावणे बंधनकारक केले आहे.

वेगवेगळ्या देशांत कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट जारी केला आहे. सध्या कोरोनाचा नवीन सब व्हेरियंट जेएन.1 लोकांमध्ये वेगाने पसरत आहे. या नवीन व्हेरियंटने अमेरिका आणि चीनमधील लोक जास्त प्रभावित झाले आहेत. हिंदुस्थानातही या व्हेरियंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून दूर राहा, बाजारात, हवाई विमानतळावर आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला सरकारने नागरिकांना दिला आहे. जवळपास एका महिन्यात कोविड-19चा सब व्हेरियंट जेएन.1ची भीती पसरली आहे. अमेरिकेत लागोपाठ रुग्ण संख्या वाढत आहे. अमेरिकेत चार आठवडय़ांत हॉस्पिटलमधील रुग्ण संख्या 23 हजार 432 झाली आहे. कोरोनाचा जेएन.1 व्हेरियंट सध्या अमेरिका आणि चीनमध्ये वेगाने पसरत आहे.

हिंदुस्थानात 24 तासांत 335 नवे कोरोना केसेस

देशात गेल्या 24 तासांत 335 नवीन कोरोना केसेसची माहिती उघड झाली आहे. तर पाच लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 1701 आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट जेएन.1 केरळमध्ये पोहोचला आहे.