‘फ्लड रेस्क्यू’साठी एनडीआरएफची टीम; गोरेगाव येथील छोटा तलावात बचाव कार्याचे ट्रेनिंग

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे पालिकाही आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज होत असून आता ‘फ्लड रेस्क्यू’साठी एनडीआरएफची टीम सज्ज होत आहे. पावसाळ्यात पूर स्थिती निर्माण होऊन कुणीही त्यामध्ये अडकल्यास त्याची सुटका करण्यासाठी ‘एनडीआरएफ’ची टीम काम करणार आहे. यासाठी एनडीआरएफच्या 25 जणांना गोरेगाव येथील छोटा तलावात ट्रेनिंग देण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून जून कोरडा घालवणारा मान्सून यावर्षी जूनमध्येच धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पालिका पावसाळापूर्व कामे वेगाने करीत आहे. शिवाय आपत्कालीन स्थितीसाठी आवश्यक यंत्रणाही सज्ज ठेवली जात आहे. पावसाळ्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली, इमारत कोसळली तर अडकलेल्यांचा बचाव करणे व सुखरुप सुटका करणे यासाठी एनडीआरएफच्या जवानांना 3 ते 5 मे दरम्यान गोरेगाव येथील छोटा तलावात ट्रेनिंग देण्यात आल्याचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे सहायक कमांडर निखील मुधोळकर यांनी सांगितले.

तीन टीम तैनात

मुंबईत पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या एकूण तीन टीम तैनात राहणार आहेत. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्पलेक्स येथे या ठिकाणी तैनात असून पावसाळ्यात मुंबईत कोणत्याही ठिकाणी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास धाव घेऊन बचावकार्य केले जात असल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.