रोनाल्डो-मेस्सी संघर्ष टळला

फुटबॉल विश्वातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी यांच्यातील द्वंद्व पाहण्याचे स्वप्न प्रत्येक फुटबॉलप्रेमी उराशी बाळगून असतो. इंटर मियामी आणि अल नासर यांच्यात होणाऱया मैत्रीपूर्ण लढतीमध्ये फुटबॉलप्रेमींचे हे स्वप्न पूर्णदेखील होणार होते, मात्र या सामन्यापूर्वीच रोनाल्डो दुखापतग्रस्त झाल्यामुळे मेस्सीविरुद्धचा संघर्ष टळला आहे. त्यामुळे फुटबॉलप्रेमींच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत.

इंटर मियामी आणि अल नासर या दोन संघात होणाऱया मैत्रीपूर्ण सामन्याच्या निमित्ताने जगभरातील फुटबॉलप्रेमींना रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यातील द्वंद्व पाहता येणार होते. रोनाल्डोचा क्लब असलेला अल नासर आणि मेस्सीचा इंटर मियामी यांच्यात गुरुवारी रात्री सामना रंगणार आहे, मात्र रोनाल्डो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. दुखापतीतून पूर्णपणे बरा होण्यासाठी रोनाल्डोला आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे रोनाल्डो इंटर मियामीविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही, असे अल नासरचे लुईस कास्ट्रो यांनी सांगितले.