रिल्ससाठी नियम धाब्यावर बसवत करत होते स्टंट, 28 बायकर्संना पोलिसांनी केली अटक

रिल्स बनविण्यासाठी अनेकजण आपला जीवही धोक्यात घालताना दिसत आहेत. असेच काहीसे चित्र बुधवारी मध्यरात्री  दिल्लीच्या रस्त्यांवर दिसले. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास विना हेल्मेट सुसाट वेगाने स्टंटबाजी करणाऱ्या बाईकस्वारांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी 28 जणांची बाईकही जप्त केली आहे.

नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त देवेश कुमार महला यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास गस्त घालत असलेल्या पोलिसांनी सुसाट आणि बेफानपणे बाईक चालवणाऱ्या एका टोळीला पाहिले. त्यांनी अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली आणि एक दोन नव्हे तर तब्बल 28 दुचाकी वाहनांना जप्त करत त्या मुलांना अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व मुलं विना हेल्मेट सुसाट वेगाने बाईक चालवत होते. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी रील शूट करण्यासाठी जमले होते. सध्या पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन सर्वांच्या बाईक जप्त केल्या आहेत.