आंदोलन आणखी चिघळले… मोदी सरकारची दडपशाही; पोलिसांच्या गोळीबारात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

शेतमालास किमान हमीभाव द्यावा (एमएसपी), कर्ज माफ करावे आदी मागण्यांसाठी राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या हजारो शेतकऱयांवर मोदी सरकारकडून दडपशाही सुरू आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास शेतकऱयांनी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ट्रक्टर्सच्या सहाय्याने बॅरिकेड्स, सिमेंट ब्लॉक्स हटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी ड्रोनद्वारे अश्रुधुराचा मारा करीत गोळीबार केला. यात एका तरुण शेतकऱयाचा मृत्यू झाला तर 100वर शेतकरी जखमी आहेत. दरम्यान, बळीराजाचे आंदोलन चिघळले असून शंभू आणि खनौरी सीमेवर प्रचंड तणाव आहे.

दोन वर्षांपूर्वी शेतकऱयांनी दिल्लीच्या सीमेवर प्रचंड आंदोलन उभारले होते. ते आंदोलन चिरडण्यासाठी मोदी सरकारने आटोकाट प्रयत्न केले. पण बळीराजा मागे हाटला नाही. त्याचीच पुर्नरावृत्ती आता दिल्लीच्या सीमेवर होत आहे. दरम्यान, गोळी लागून 21 वर्षीय तरुण शेतकऱयाचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकरी नेते सरवन सिंग पंधेर यांनी केला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिमी उत्तरप्रदेशमधील हजारो शेतकरी ‘दिल्ली चलो’चा नारा देत 13 फेब्रुवारीपासून शंभु, खनौरी, धाबी गुजरन सीमेवर एकवटले आहेत. मोदी सरकारने सिमेंटचे ब्लॉक्स टाकून, बॅरिकेट्स लावून, खिळे ठोकून सीमा सील केल्या आहेत.

सरकारकडून आंदोलनात पहिला बळी

पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे या आंदोलनात शेतकऱयाचा पहिला बळी गेला आहे. खनौरी सिमेवर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. यामुळे शेतकरी सैरभैर पळू लागले. यावेळी पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात शुभकरनसिंग (वय 21) या शेतकऱयाचा मृत्यू झाल्याचा आरोप ऑल इंडिया किसान काँग्रेसचे चेअरमन सुखपाल सिंग खैरा यांनी केला आहे. हा शेतकरी पंजाबच्या भटिंदा जिल्हय़ातील आहे. तीन शेतकरी गंभीर जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरूण शेतकऱयाचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. या धुमश्चक्रीत 12 पोलीसही जखमी झाले.

दोन दिवस आंदोलन स्थगित

शेतकऱयाच्या मृत्यूमुळे ‘दिल्ली चलो’ आंदोलन दोन दिवस स्थगित केल्याची माहिती शेतकरी नेते सर्वामसिंग पंधेर यांनी दिली. शुक्रवारी आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असे त्यांनी सांगितले.

पोलीसांकडून ट्रक्टर्सची नासधूस, रबरी गोळ्यांचा मारा

– आज सकाळी 11 वाजता दिल्ली प्रवेश करणारच अशी घोषणा शेतकऱयांनी केली होती. त्यासाठी हरियाणातील अंबालाच्या शंभु सीमेवर हजारो शेतकरी 1200 वर ट्रक्टर्ससह सज्ज होते. ट्रक्टर ट्रॉली, पोकलेन, मिनी बसेस, 200 वर कार, बॅरिकेट्स तोडण्यासाठी एक्सपॅवेटर्स तयार होती.

– 11 च्या सुमारास शेतकऱयांनी ट्रक्टर्सनी बॅरिकेट्स तोडले.

– शंभु सीमेप्रमाणेच सिंधु सीमेवरही हजारो शेतकरी जमले आहेत. धाबी-गुजरन सीमेवर 500 ट्रक्टर्ससह 4500 शेतकरी आहेत.

– शेतकऱयांना रोखण्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी बळाचा वापर करीत अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. ड्रोनच्या सहाय्याने अश्रुधुराचा मारा करण्यात आला. रबरी गोळ्यांचा मारा केला. शेतकऱयांच्या 50 वर ट्रक्टर्सची पोलिसांनी नासधुस केली. यावेळी पोलीस आणि शेतकऱयांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली.

– खनौरी सीमेवरूनही शेतकऱयांनी दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. बॅरिकेट्स तोडण्यासाठी शेतकऱयांनी पोकलेन आणले आहेत. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. शंभु आणि खनौरी सिमेवर धुमश्चक्री 100 वर शेतकरी जखमी झाले आहेत.

मोदी पुन्हा शेतकऱयांच्या जिवावर उठले

खनौरी बॉर्डरवर तरुण शेतकरी शुभकरण सिंह याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना हृदयद्रावक आहे. माझ्या सहवेदना त्याच्या कुटुंबियांसोबत आहेत. गेल्या आंदोलना वेळी मोदींच्या अहंकाराने 700 शेतकऱयांचे बळी घेतले होते. आता ते पुन्हा शेतकऱयांच्या जिवावर उठले आहेत. मीडियाच्या मागे लपलेल्या भाजपाकडे एक दिवस इतिहास शेतकरी हत्येचा हिशोब नक्कीच मागेल.