Photo – कुणकेश्वर यात्रा उत्सव देवस्वाऱ्यांच्या आगमनाने दुमदुमून गेला

दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सवात शुक्रवारी सायंकाळी सातनंतर 6 देवस्वाऱ्यांच्या आगमनाने आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात दुमदुमून गेला.

रविवारी (10 मार्च) दर्श अमावस्येनिमित्त देवस्वाऱ्यांसह पवित्र तीर्थ स्नान होते. यासाठी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, कुणकेश्वर पोलीस, महसूल, आरोग्य विभाग व अन्य सर्व विभाग सज्ज झाले असून येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री देवस्वारी सोबत गावोगावचे हजारो भाविक येथे दाखल झाली असून शनिवारी मध्यरात्री नंतर देवस्वाऱ्या समुद्रस्नानासाठी रवाना होतील. श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा 8 मार्च ते 10 मार्च 2024 या कालावधीत पार पडत आहे. या वर्षी 6 देवस्वारी कुणकेश्वर येथे दाखल झाल्या आहेत.

यावर्षी श्री कुणकेश्वर भेटीकरीता व तिर्थस्नानासाठी श्री देवी भगवती देवस्थान – मुणगे देवगड, श्री देव बोंबाडेश्वर – पावणाई देवस्थान मठबुद्रुक – मालवण, श्री देव भैरवनाथ देवस्थान वरवडे – कणकवली, श्री माधवगिरी देवस्थान माईण कणकवली, श्री देव गांगेश्वर देवस्थान नारिंग्र देवगड, श्री देव बाणकालिंग पावणाई देवस्थान हुंबरठ कणकवली या देवस्वाऱ्या भाविकांसह दाखल झाल्या आहेत.

श्री देव कुणकेश्वर यात्रौत्सवात शुक्रवारी सायंकाळी खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन श्री देव कुणकेश्वर देवाचे दर्शन घेतले. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख गणेश गावकर, गणेश वाळके व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.