धैर्यशील मोहिते-पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट; तुतारीवर निवडणूक लढवणार?

भाजपने माढय़ातून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बुधवारी रात्री उशिरा मुंबईत शरद पवारांची मुंबईत भेट घेतली.  या भेटीत धैर्यशील यांचा शरद पवार गटातील प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते. धैर्यशील पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास ते माढय़ातून तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे.

महाविकास आघाडीत माढा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाटय़ाला आला आहे. शरद पवार गटाने माढा लोकसभा मतदारसंघातून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसून उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. तर माढय़ातून निवडणूक लढविण्यासाठी धैर्यशील मोहिते-पाटील इच्छुक आहेत. त्यामुळेच भाजपने निंबाळकरांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते-पाटील घराण्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. मोहित-पाटील घरण्याची ही नाराजी हेरून शरद पवार गटातर्फे यापूर्वी अमोल कोल्हे यांनी अकलूजला जाऊन विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह रणजितसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील यांची भेट घेतली होती. शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी मोहिते-पाटीलांवर त्यांच्या समर्थकांकडून दबाव येत आहे

तर संजीवबाबा निंबाळकरांचा पर्याय

माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते-पाटील इच्छुक असले तरी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेऊ नये म्हणून भाजपकडून या मोहिते-पाटील कुटुंबावर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे मोहिते-पाटलांनी ऐनवेळी कच खाल्ली तर शरद पवारांनी विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पराभूत करण्यासाठी फलटणमधूनच रामराजे यांचे बंधू संजीवबाबा नाईक-निंबाळकर यांचाही पर्याय ठेवला असून त्यांना उमेदवारी दिली जाईल. अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.