सयाजीराव गायकवाड यांच्या साहित्यिक-सामाजिक योगदानावर परिसंवाद रंगला

वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी राजगादीवर बसणार्‍या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक व धार्मिक अशा सर्वंच क्षेत्रात भरीव योगदान दिले. शिक्षण मोफत व सक्तीने देण्याची क्रांती करणारे सयाजीराव हे पहिले महाराजा ठरले. आपल्या कार्यकाळात सुमारे 7 हजार 500 ग्रंथ प्रकाशित करण्याचा विक्रमदेखील सयाजीराव गायकवाड यांच्या नावावर होता. आज सयाजीराव यांचे विचार समाजात रुजण्याची आवश्यकता असण्याचा सूर परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी कविवर्य ना. धो. महानोर सभागृहात सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान या विषयांवर परिसंवाद पार पडला. परिसंवादाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक बाबा भांड, तर परिसंवादात प्रा. तुषार चांदवडकर व प्रा. रमेश माने या वक्तव्यांनी आपले विचार मांडले.

यावेळी बोलताना बाबा भांड म्हणाले, 12 व्या वर्षी राजा झालेल्या सयाजीराव गायकवाड यांनी सहा वर्षांत स्वतःच साक्षर होऊन 1880 मध्ये अस्पृश्य व आदिवासी यांच्यासाठी प्रथमच सक्तीच्या शिक्षणाचा हुकूम काढून महात्मा फुले यांचे स्वप्न साकार केले. सयाजीरावांनी पुरोहित कायदा केला. त्याकाळात जगात सातव्या क्रमाकांचे श्रीमंत असलेल्या सयाजीराव यांनी सुमारे 89 कोटी रूपयांची शिष्यवृत्ती व इतर योजनांच्या माध्यमातून समाजाला मदत केल्याचेही बाबा भांड यांनी सांगितले. आजच्या काळात सयाजीराव गायकवाड यांच्या विचाराची गरज विषद केली. यावेळी तुषार चांदवडकर यांनी साहित्य व भाषा प्रसारातील सयाजीराव यांचे कार्य आपल्या मनोगतातून मांडले, तर रमेश माणिक यांनी सयाजीरावांनी केलेल्या सामाजिक विकासांचा आढावा घेतला.

संत शिकवणीने समाज आणि राजकारण शुद्ध करणे शक्य

दिव्यदृष्टी विकसीत करण्यासाठी संतांची मूल्ये स्वीकारली तर समाज आणि राजकारण पूर्णपणे शुद्ध करणे शक्य नसलेतरी त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते, असा सूर राजकीय आणि सामाजिक प्रदूषणावर संत साहित्य हाच उपाय या परिसंवादातील वक्त्यांच्या मांडणीतून निघाला.

मुख्य सभागृह संत बहिणाबाई सभामंडपात मुंबई येथील अ‍ॅड. धनराज वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यात अमरावती येथील डॉ. मनोज तायडे, लातूर येथील डॉ. ज्ञानदेव तायडे, वाळवा येथील दि. बा. पाटील, बिदर येथील इंदूमती सुतार आणि धरणगाव येथील प्रा. चत्रभूज पाटील यांनी सहभाग घेतला. या परिसंवादात सर्वच मान्यवरांनी आपल्या विष्लेषणात संतांनी केलेल्या कार्याची आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीची महती सांगितली. संतांनी धर्माचा वापय समाज कल्याणासाठी करा अशी शिकवण दिली. मात्र समाज आणि राजकारणी यांनी या शिकवणाीला वेगळे वळण दिल्याने समाज आणिा राजकारण गाढूळ झाल्याचे सर्वांनी मान्य केले. मात्र संत शिकवणीचा अंगिकार केल्यास समाज आणिा राजकारणात बदल घडवून आणता येऊ शकतो असा सूर या संवादातून निघाला. संत साहित्याने जातीभेद नष्ट करण्याचे काम केले. अंधश्रद्धेचे खंडण करण्याचे काम केले. मात्र असे असतानाही आपण संतांना आदराचे स्थान देत असलो तरी आज समाज आणि राजकारण प्रदुषित झाले आहे. कारण समाज आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण निवडणुकीत रेशनच्या कीट वाटणारे नेते सर्वत्र दिसत आहेत. असे चित्र जर असेल तर संतांनी कितीही कीर्तने केली तरी समाज राजकारणी सुधारणार नाहीत. कारण शेकडो वर्षांच्या परंपरेत शैल संप्रदाय, विरशैव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांनी समाज कल्याणाच्या, एकोप्याची शिकवण दिली आहे. मात्र वारकरी कितीही प्रामाणिक असला तरी समाज बदलायला तयार नसेल तर राजकारणी समाजाला विकून खातील अशाी भीतीही या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. राजकारणही आता पूर्वीसारखे संवेदनशिल राहिले नाही याचा दाखला देताना भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी मतदाराला गाडी देऊन रेल्वेने प्रवास केल्याची आणि राजीव गांधी यांनी अटलबिहरी वाजपेयी यांनी आजारपणावर उपचारासाठी विमानाने पाठवल्याची उदाहरणे दिली. दरम्यान, परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर जोशी यांनी केले.